बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी सर्वश्रूत आहे. चीनच्या खेळाडू सातत्यपूर्ण खेळ करतात, मात्र त्यांनाही नमवता येते असे उद्गार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने काढले. सिंधूने काही दिवसांपूर्वीच झालेल्या मलेशियन ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
चीनच्या खेळाडूंना नमवण्यासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणे अत्यावश्यक असते. चीनच्या खेळाडूंना निश्चितपणे नमवता येते, सामन्याच्या विशिष्ट दिवशी जो खेळाडू चांगला खेळतो तो जिंकतो असे तिने पुढे सांगितले.
सिंधू यावर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती लि झेरुईवर विजय मिळवत संस्मरणीय विजय मिळवला होता.
चीनच्या खेळाडूंविरुद्ध कुठल्याही प्रकारचे मानसिक दडपण नसते. मी चीनच्या दोन खेळाडूंविरुद्ध खेळले आहे. एका सामन्यात मी विजयी झाले मात्र दुसऱ्या सामन्यात मला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु कोणत्याही स्वरूपाचे दडपण माझ्यावर नव्हते. मी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. प्रशिक्षकांनी मला सातत्याने मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले.
मलेशियन ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील यश हे बॅडमिंटनप्रती लहानपणापासून घेत प्रयत्नांचे फळ आहे. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद आणि पालकांचा या यशात मोठा वाटा असल्याचे सिंधूने सांगितले. सिंधूचे वडील पी. व्ही.  रामण्णा तसेच आई दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू होते.
या वर्षांच्या अखेरीपर्यंत जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये झेप घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे तिने सांगितले. क्रमवारीत अव्वल स्थान गाठणे हे प्रदीर्घकालीन उद्दिष्ट आहे. काही दिवसांतच सुरू होणाऱ्या सुदीरमान चषकात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास सिंधूने व्यक्त केला. आक्रमक बॅडमिंटन खेळायला आवडत असल्याचेही तिने स्पष्ट केले.

Story img Loader