चिपलकट्टी स्मृती बॅडमिंटन स्पर्धा
रसिका राजे व सारा नक्वी यांनी मुलींच्या गटात तर सुधांशु मेडशीकर व आदित्य जोशी यांनी मुलांच्या गटात पहिल्या फेरीत विजय मिळवित सुशांत चिपलकट्टी स्मृती चषक आंतरराष्ट्रीय कुमार मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत झकास सलामी केली. ही स्पर्धा लक्ष्मी क्रीडा मंदिर बॅडमिंटन क्लबने आयोजित केली आहे.
मॉडर्न क्रीडा संकुलात या स्पर्धेतील मुख्य फेरीस शुक्रवारी प्रारंभ झाला. नक्वी हिने भारताचीच खेळाडू देविका रवींद्र हिच्यावर २१-१८, २१-१६ असी मात केली. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. मुलींच्याच विभागात रसिका राजे हिने आपलीच सहकारी रुबीसिंग हिला २१-१४, २१-४ असे सरळ दोन गेम्समध्ये नमविले. तिने परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. सिंधू भारद्वाज हिने गौरी आसजी हिचा २१-१५, २१-९ असा पराभव केला. त्या तुलनेत सईदा अर्शीन या भारतीय खेळाडूलाच विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. तिने आपलीच सहकारी शिखा गौतम हिचे आव्हान २१-१९, ८-२१, २१-१७ असे संपुष्टात आणले.
मुलांच्या विभागात आदित्य जोशी या भारतीय खेळाडूने फिलिपाईन्सच्या मॉन्टेरुबीओ जोशुआ याच्यावर २१-९, २१-१५ अशी मात केली. त्याने परतीच्या खणखणीत फटक्यांचा सुरेख उपयोग केला. सुधांशु मेडशीकर याने यश नरेन याचे आव्हान २१-१२, २१-१७ असे संपुष्टात आणले. पाचव्या मानांकित गोपी राजू याने बांगलादेशच्या महंमद अब्दुल मोमेन याचा २१-१०, २१-११ असा लीलया पराभव केला. द्वितीय मानांकित वेई जियान एई (मलेशिया) याला भारताच्या देवांशु जयस्वाल याने कडवी लढत दिली. हा सामना वेई याने २१-१९, १४-२१, २१-१७ असा जिंकला व दुसरी फेरी गाठली.  हर्षिल दाणी याने बांगला देशच्या महंमद अरीफ हुसेन याला २१-१४, २१-७ असे पराभूत करीत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. 

Story img Loader