आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच पार पडला. या हंगामात अनेक खेळाडूंना कोट्यवधीच्या बोली लागल्या, तर अनेकांच्या पदरी निराशा पडलेली पहायला मिळाली. या लिलावानंतर जम्मू-काश्मिर राज्यातील एका गावातील नागरिक भलतेच आनंदात आहेत. कारण त्यांच्या गावातील मंझुर दर या खेळाडूवर किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने २० लाखांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं. २४ वर्षीय दरच्या लिलावासंदर्भातसली माहिती कळल्यानंतर त्याच्या गावातील लोकांनी रस्त्यावर येत नाचत आपला आनंद व्यक्त केला.
गावकऱ्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर, भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने काश्मिरी युवकांना भावनिक आव्हान केलं आहे. हातात दगड आणि बंदूक घेण्याऐवजी बॅट-बॉल घेतलं तर परिस्थिती कशी बदलू शकते आणि काश्मिर अजुन किती सुंदर दिसू शकतं याचं उदाहरण मंझुरने दाखवून दिलं आहे. मंझुर हा आयपीएलमध्ये खेळणारा दुसरा काश्मिरी युवक ठरला आहे.
What a wonderful feeling it must be for Manzoor Dar to watch the celebrations.If instead of a gun,the youth pick up a bat,if instead of stones,the youth pick up a ball,the atmosphere in Kashmir will become beautiful.They need to be encouraged to play a sport & govt should support pic.twitter.com/BppeduLPye
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 1, 2018
अकराव्या हंगामात जम्मू-काश्मिरमधून दर या एकमेव खेळाडूवर बोली लावण्यात आलेली आहे. आपल्या गावात ‘पांडव’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंझुर दरने विजय हजारे करंडकात जम्मू-काश्मिरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या धिप्पाड देहयष्टीसाठी ओळखला जाणारा मंझुर हा स्थानिक लोकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. क्रिकेटव्यतिरीक्त आपल्या परिवाराचं पालनपोषण करण्यासाठी मंझुर दर सुरक्षारक्षकाचीही नोकरी करतो.