पीटीआय, नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) बदलांचे वारे वाहत असून शुक्रवारी ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका माजी फुटबॉलपटूची या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे. शुक्रवारी ‘एआयएफएफ’च्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या जागांसाठी थेट लढती होणार आहेत.

अध्यक्षपदासाठी माजी कर्णधार आणि दिग्गज आघाडीपटू बायच्युंग भुतियापुढे मोहन बागान व ईस्ट बंगालचे माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांचे आव्हान असेल. या दोघांमध्ये चौबे यांचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल येथील नेते चौबे यांना गुजरात, अरुणाचल प्रदेश अशा राज्यांचा पाठिंबा लाभला आहे. चौबे यांना ईशान्य भागातील एका नामांकित व्यक्तीचेही पाठबळ असल्याची चर्चा आहे. याच कारणास्तव भुतियाच्या उमेदवारीला त्याचे स्वत:चे राज्य सिक्कीमकडून पाठिंबा मिळत नसल्याचे म्हटले जात आहे.

उपाध्यक्षपद व कोषाध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळेल. उपाध्यक्षपदासाठी राजस्थान फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते मानवेंद्र सिंग यांच्यापुढे कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हॅरिस यांचे आव्हान असेल. दुसरीकडे, कोषाध्यक्षपदासाठी आंध्र प्रदेश फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष गोपालकृष्ण कोसाराजू आणि अरुणाचल प्रदेश फुटबॉल संघटनेचे सचिव किपा अजय हे दोन उमेदवार आहेत.