आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्यावर केलेल्या मॅच-फिक्सिंगच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून मी निदरेष आहे, असे न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सने सांगितले. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी केर्न्सविरुद्ध मॅच-फिक्सिंगचे आरोप केले होते. त्या आरोपांना आव्हान देत केर्न्सने त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला केर्न्सने जिंकला आहे. या निर्णयाचा आधार घेत आयसीसीनेही माझ्यावरील आरोप मागे घ्यावेत असे केर्न्सने सांगितले. तो म्हणाला, ‘‘मी कधीही खेळाची प्रतारणा केलेली नाही. मी प्रामाणिकपणेच क्रिकेट खेळत आलो आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही माझी चौकशी केलेली नाही. तसेच आयसीसीने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत कधीही चौकशी समिती नेमलेली नाही. त्यामुळेच आयसीसीने माझ्यावरील आरोप मागे घ्यावेत म्हणजे मी निष्कलंक असल्याचे सिद्ध होईल. कोणत्याही चौकशीला केव्हाही सहकार्य करण्याची तयारी मी दाखविली आहे.’’ ‘‘जर माझ्यावरील आरोपांची चौकशीच केली जात नसेल याचाच अर्थ केवळ माझी बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात आले असावेत. माझ्या कारकिर्दीतील असलेला हा डाग पुसून काढण्यासाठी मी सदैव तयार आहे. मी निदरेष असून प्रसारमाध्यमांनी विनाकारण मॅच-फिक्सिंगबाबत माझे नाव घेऊ नये अशी माझी इच्छा आहे,’’ असेही केर्न्सने सांगितले.

Story img Loader