आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी
आक्षेपार्ह वर्तनामुळे काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश ट्वेन्टी-२० लीग स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्सचे प्रतिनिधित्त्व करताना १२ चेंडूत अर्धशतकाची नोंद केली. यासह युवराज सिंगच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० प्रकारातील १२ चेंडूत ५० धावांच्या विक्रमाची बरोबरी केली. मात्र गेलच्या वेगवान खेळीनंतरही मेलबर्न रेनेगेड्स संघाचा पराभव झाला.
२ चौकार आणि ७ षटकारांसह १७ चेंडूत ५६ धावांची वादळी खेळी करुन गेल तंबूत परतला. विजयासाठी १७१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळालेले असताना गेलने आक्रमक खेळीसह संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती मात्र अन्य खेळाडूंना हे आव्हान पेलवले नाही आणि मेलबर्न रेनेगेड्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. मेलबर्न संघाचा डाव १४३ धावांतच आटोपला. तत्पूर्वी अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाने १७० धावांचा डोंगर उभारला. टीम ल्यूडमनने ४१ चेंडूत ४९ जोनो डीनने ३५ चेंडूत ४८ धावांची खेळी केली.

Story img Loader