Chris Gayle’s First IPL Century: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आयपीएल २०२३चा हंगाम सुरू होण्यापूर्वी अनबॉक्स इव्हेंट नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये दोन दिग्गजांना आरसीबी हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले आहे.ज्यामध्ये एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ख्रिस गेलने त्याच्या पहिल्या आयपीएल शतकाची आठवण करून दिली. त्याने सांगितले की, कोहलीने त्याला पहिले आयपीएल शतक झळकावण्यात कशी मदत केली होती.
आरसीबीच्या या कार्यक्रमादरम्यान ख्रिस गेलने सांगितले की, “जेव्हा मी आरसीबीसाठी माझ्या पहिल्या सामन्यात ९८ धावांवर होतो, तेव्हा विराट कोहलीने काही चेंडू सलग ब्लॉक केले होते. जेणेकरून मी माझे पहिले आयपीएल शतक करू शकेन.” ख्रिस गेलने २०११ मध्ये आरसीबीकडून खेळताना केकेआरविरुद्ध आयपीएलचे पहिले शतक झळकावले होते.
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकात १७१ धावा केल्या. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना गेलने आरसीबीसाठी ५५ चेंडूत १०२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याबरोबर विराटनेही ३० धावांची नाबाद खेळी साकारली होती. त्यांच्याशिवाय तिलकरत्ने दिलशानने 38 धावांचे योगदान दिले होते.
गेलच्या पहिल्या शतकातासाठी विराटने मदत केली होती –
आरसीबीने हा सामना १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जिंकला. पण विराटला १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच सामना जिंकवता आला असता, पण त्याने तसे केले नाही. विराटने १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर आरसीबीला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज होती आणि गेल नॉन स्ट्राइकवर होता, तो ९८ धावांवर नाबाद होता. त्यानंतर कोहलीने सलग सहा चेंडू ब्लॉक केले आणि एकही धाव घेतली नाही. या सहा चेंडूंपैकी एक चेंडू वाईड होता. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून देताना आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केले.
त्या पहिल्या शतकानंतर ख्रिस गेलने आरसीबीसाठी अनेक शतके झळकावली. त्याचबरोबर आयपीएलचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आरसीबीने त्याला हॉल ऑफ फेमचा सन्मानही दिला. तसेच ३३३ क्रमांकाची जर्सी कायमची निवृत्त म्हणून घोषित केली.
आयपीएल २०२३ साठी आरसीबीचा संपूर्ण संघ-
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपली, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल.