South Africa Champions vs West Indies Champions Updates : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या स्पर्धेतील ७ जुलैची संध्याकाळ खास होती. कारण या स्पर्धेत ख्रिस गेलचे झंझावाती वादळ पुन्हा पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गेल वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्मध्ये वेस्ट इंडिज चॅम्पियन्सकडून खेळत आहे. रविवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी साकारत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. बर्मिंगहॅमच्या मैदानावर त्याने अवघ्या ४० चेंडूंमध्ये ७० धावांची दमदार खेळी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दिलेले मोठे लक्ष्यही कमी पडल्याचे दिसले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्सने २० षटकांत ५ गडी गमावून १७४ धावा केल्या. आश्वेल प्रिन्स आणि डॅन विलास यांनी केलेल्या ४६ आणि ४४ धावांच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने या धावा केल्या. या दोघांशिवाय रिचर्ड लुईसने २० धावांची तर जेपी ड्युमिनीने २३ धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मदने सर्वाधिक २ बळी घेतले.
गेलच्या वादळापुढे १७५ धावांचे लक्ष्य पडले ठेंगणे –
वेस्ट इंडिज चॅम्पियन्ससमोर १७५ धावांचे मोठे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ८.३ षटकांत ६५ धावा जोडल्या. स्मिथ २२ धावा करून बाद झाला पण गेलचे वादळ घोंगावतच राहिले. त्याने दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेताना. ज्यामुळे वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने १७५ धावांचे लक्ष्य ५ चेंडू शिल्लक असताना पूर्ण करुन सामना जिंकला.
ख्रिस गेलची ७० धावांची वादळी खेळी –
या सामन्यात ख्रिस गेलने ४० चेंडूंचा सामना करत ७० धावा केल्या. त्याने १७५ च्या स्ट्राईक रेटने खेळताना ६ षटकार आणि ४ चौकार ठोकले. गेल जेव्हा आऊट झाला तोपर्यंत काम पूर्ण झाले होते. वेस्ट इंडिजला जास्त धावा करायच्या नव्हत्या. संघाच्या हातात ८ विकेट्स व्यतिरिक्त ७ षटके बाकी होती. त्यामुळे वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने हा सामना ६ गडी राखून जिंकला. वेस्ट इंडिजने १७५ धावांचे लक्ष्य १९.१ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. ख्रिस गेलला त्याच्या स्फोटक खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.