आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेच्या आधी कॅरेबियन खेळाडूंमध्ये एक मोठा शाब्दिक संघर्ष सुरु झालाय. यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला ख्रिस गेलचा काही फायदा होणार की नाही याबद्दल मतमतांतरे आहेत. अशातच आता आयपीएलच्या पर्वामध्ये टी २० विश्वचषकाआधी आरामकरण्यासाठी पंजाब किंग्सच्या संघाला स्पर्धेत अर्ध्यातच सोडून गेलेल्या ख्रिस गेलने आपल्या टीकाकारांना आणि खास करुन माजी क्रिकेटपूट कर्टली अॅम्ब्रोसवर हल्लाबोल केलाय.
गेलने म्हटलंय की एम्ब्रोस हा केवळ लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने अशाप्रकारची वक्तव्य करत आहे. अॅम्ब्रोसने विश्वचषकासाठीच्या वेस्ट इंडिजच्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघात आपल्याला ख्रिस गेलला पहायला आवडणार नाही असं म्हटलं होतं. याचसंदर्भात गेलला एका रेडिओ स्टेशनवर द आईसलॅण्ड टी मॉर्निंग शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता तो संतापला. “मी तुम्हाला माझं मत सांगू शकतो आणि तुम्ही ते हवं तर त्याला सांगू शकता की ख्रिस गेल ‘युनिव्हर्सल बॉस’च्या मनामध्ये कर्टली अॅम्ब्रोसबद्दल थोडासुद्धा आदर नाहीय. तो काहीही म्हटला तरी मला फरक पडत नाही,” असं उत्तर गेलने दिलं.
“मी सध्या कर्टली अॅम्ब्रोसबद्दल तुमच्याशी बोलत आहे. तसा तो तुमच्याप्रमाणे सर्वासमान्यांपैकी एक आहे. मी जेव्हा वेस्ट इंडिजच्या संघामध्ये आलो तेव्हा त्याचा फार सन्मान करायचो. मी जेव्हा संघात आलो तेव्हा यांच्याकडे फार सन्माने पहायचो. पण आता मी माझ्या हृदयापासून बोलतोय. मला कळत नाही ते निवृत्त झाल्यापासून त्याच्या मनात ख्रिस गेलबद्दल काय आहे? ते ज्यापद्धतीने नकारात्मक गोष्टी प्रसारमाध्यमांसमोर बोलता. त्याला लक्ष वेधून घ्यायचं असतं की काय मला ठाऊक नाही. मात्र ते नेहमी असं करतात. त्यामुळेच त्यांच्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं असं त्यांना वाटत असल्यानेच मी हे बोलतोय,” असा टोला ख्रिस गेलने लगावला.
याचसंदर्भात अॅम्ब्रोस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्याकडे या टीकेला उत्तर देण्यासाठी वेळ नसल्याचं म्हटलं. “मी उत्तर देईल पण आधी त्याने जे काही म्हटलंय ते मला समजून घ्यायचं आहे. मी माझे विचार एकत्र करुन मत तयार करेल आणि त्यानंतर उत्तर द्यायचं असेल तेव्हा तुम्हाच्याशी बोलेन,” असं अॅम्ब्रोस यांनी क्रिकबजशी बोलताना सांगितलं.
“माझा सध्या अॅम्ब्रोससोबत काहीही संबंध नाहीय. मला आता त्याचा आदरही वाटत नाही. मी जेव्हा त्याची भेट घेईन तेव्हा मी हे नक्की सांगेन. नकारात्मक प्रतिक्रिया न देता विश्वचषकाआधी संघाला प्रोत्साहन द्या. संघ निवडण्यात आला असून आता आम्हाला समर्थन म्हणून माजी खेळाडूंच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. आम्हाला सकारात्मक विचार हवाय, नकारात्मक विचार नकोय. दुसऱ्या संघांना त्यांचे माजी खेळाडू समर्थन करताना दिसतात, मग आमचे खेळाडू अशा मोठ्या स्पर्धेआधी आमचं समर्थन का करत नाहीत?,” असा प्रश्न गेलने पुढे बोलताना उपस्थित केलाय.
“आम्ही दोनदा ही स्पर्धा जिंकलीय. आता आम्ही तिसऱ्यांदा ती जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय. संघाने पाहिलं आहे की काय घडतंय. याचा संघावर प्रभाव पडतो. जर माजी खेळाडू अशाप्रकारे नकात्मक बोलणार असतील तर मी त्यांना सन्मान देऊ शकत नाही,” असं गेलने स्पष्ट केलं आहे.