अॅशेस मालिकेत झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंड संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील काळजीवाहू कर्णधाराची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचा मानहानीकारक पराभव झाल्यापासून सिल्व्हरवूड यांच्यावर टांगती तलवार होती.
२०१९मध्ये सिल्व्हरवूड यांनी इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. यापूर्वी ते संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. सिल्व्हरवूड यांच्या गंच्छंतीनंतर नव्या प्रशिक्षकाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक स्टीफर्टला ही जबाबदारी दिली जाऊ शकते, असे वृत्त आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक अॅश्ले जाईल्स यांनीही त्यांचे पद सोडले आहे.
हेही वाचा – PAK vs AUS : अखेर २४ वर्षाची प्रतीक्षा संपली..! ऑस्ट्रेलियन संघ करणार पाकिस्तान दौरा
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, “ख्रिस सिल्व्हरवूडने आपल्या कार्यकाळात संघाला यश मिळवून देण्यासाठी सर्व काही केले. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंड क्रिकेट संघ कसोटीत अव्वल संघ बनला. आम्ही दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला जाऊन कसोटी मालिका जिंकल्या. आगामी काळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी अँड्र्यू स्ट्रॉसची काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.