कटु गोड आठवणींचा स्वाद ठेऊन हे वर्ष संपले. या वर्षभरात आपण काय केले आणि काय करायचे राहून गेले याची यादी संपणार नाही परंतु माझ्या कारकीर्दीतील बहुधा हे वर्ष सर्वात फलदायी ठरले असे उद्गार काढले आहेत जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने. या वर्षभरात मी सर्वकाही जिंकले असेच म्हणावे लागेल. माझ्या या यशामुळे माझ्यावर संशय घेणाऱ्या टीकाकारांची तोंडे बंद झाली आहे असे ख्रिस्तियानोने म्हटले. फुटबॉलमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅलन डी ओर, दुबई ग्लोब सॉकर अवार्डमध्ये मिळालेला वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू जिंकलेल्या रोनाल्डोने हे उद्गार काढले.
वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर हे वर्ष माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम वर्ष असल्याचे रोनाल्डोनने म्हटले. एकाच वर्षात माझा राष्ट्रीय संघ पोर्तुगालने यावर्षी युरो कप जिंकला, माझ्या रिअल माद्रिद या क्लबने चॅम्पियन्स लीग जिंकले तर मी बॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकला. यापेक्षा मी अधिक काय मागू शकतो? असे तो म्हणाला. मी केवळ रिअल माद्रिदतर्फे चमकदार प्रदर्शन करू शकतो, राष्ट्रीय संघासाठी मी ही कामगिरी करू शकत नाही असे माझे टीकाकार म्हणत असत परंतु आता त्यांना बोलण्यासाठी काही उरले नसल्याचे तो म्हणाला. मी जे काही यश या वर्षात संपादित केले आहे त्याबद्दल मला माझ्या राष्ट्रीय संघातील सहाकारी खेळाडूंचे आणि रिअल माद्रिदच्या सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत, असे रोनाल्डो म्हणाला.
२०१६ च्या मेपासून रोनाल्डोचे जिंकण्याचे सत्र सुरू झाले. मे २०१६ मध्ये अॅटलेटिको माद्रिद या संघाला अंतिम सामन्यात नमवून रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगचा करंडक उचलला. रोनाल्डो संघात असताना रिअल माद्रिद दोन वेळा चॅम्पियन्स लीगचा विजेता ठरला आहे. याआधी २०१४ मध्ये रिअल माद्रिदने ही कामगिरी बजावली होती. जेव्हा रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेडमध्ये होता त्यावेळी २००८ ला त्याच्या संघाने चॅम्पियन्स लीग जिंकले होते.
२०१६ ला युरो चषकासाठी तो पोर्तुगीज टीमचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात संघाने युरो चषक जिंकले. रिअल माद्रिद आणि पोर्तुगालला विजयी करण्यासाठी त्याने केलेले गोल महत्त्वपूर्ण ठरले त्यामुळेच त्याची बॅलन डी ओर साठी निवड झाली. त्यानंतर त्याच्या नेतृत्वात रिअल माद्रिदने फिफाचा क्लब वर्ल्ड कप जिंकला.