संशयास्पद गोलंदाजांच्या शैलीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आता घेतलेली भूमिका म्हणजे २० वर्षांनंतर आलेली जाग आहे, असे उद्गार ऑस्ट्रेलियाचे माजी पंच डॅरेल हेअर यांनी काढले. हेअर यांनीच १९९५मध्ये श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची गोलंदाजांची शैली संशयास्पद असल्याची तक्रार केली होती. एवढय़ा वर्षांत अवैध गोलंदाजांना कुरणच मिळाले अशा खरमरीत शब्दांत हेअर यांनी आयसीसीवर टीकास्त्र सोडले आहे.
‘‘१९९५मध्ये आयसीसीला संशयास्पद पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची संधी होती. मात्र त्यांनी त्यासाठी १९ वर्ष घेतली. आता त्यांना अवैध शैलीने गोलंदाजी करणाऱ्यांना खेळातून हद्दपार करायचे आहे. मुरलीधरन, हरभजन सिंग आणि साकलेन मुश्ताक यांच्यावर अगदी सौम्य कारवाई करण्यात आली. सईद अजमल इतकी वर्षे कशी गोलंदाजी करू शकला, याचे मला आश्चर्य वाटत होते. नियमानुसार १५ अंशांमध्ये हात वळणे कायदेशीर आहे. मात्र त्याच्या शैलीनुसार त्याचा हात ४५ अंशांमध्ये वळतो. हे सर्वसामान्य माणसालाही कळू शकते. मात्र पंचच कमकुवत झाल्याने याबाबत काहीच ठोस भूमिका घेता आली नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.
मुरलीधरनची गोलंदाजीची शैली अवैध घोषित करण्यात आलेल्या कसोटीविषयी हेअर म्हणाले, ‘‘आयसीसीच्या आताच्या भूमिकेने मला आनंद व्हायला हवा असे लोक म्हणतात. कारण मी त्यावेळी मुरलीधरनच्या शैलीविरोधात जी भूमिका मी मांडली होती ती आता सार्वत्रिक झाली आहे. संशयास्पद शैली असलेल्या गोलंदाजांवर सक्त कारवाई होत आहे. पण यातून मला कोणतेही वैयक्तिक समाधान होत नाहीये. मी तेव्हाही वैयक्तिक आकसातून अहवाल दिला नव्हता. मी माझे चोखपणे बजावले होते. मात्र अन्य पंच हे धारिष्टय़ करण्यास तयार नव्हते. रॉस इमर्सन यांची भूमिका माझ्याप्रमाणे होती. मात्र आयसीसीने त्यांना पिछाडीवर ठेवले.’’

Story img Loader