बुधवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याचा सहभाग अनिश्चित झाला आहे. मंगळवारी होबार्टला सराव करताना क्लार्कच्या पायाचा घोटा दुखावला आहे.
क्लार्कची दुखापत फारशी गंभीर नसली, तरी अद्याप त्याच्या सहभागाबाबत वैद्यकीयतज्ज्ञांनी अनिश्चितता व्यक्त केली. पाच सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या दोन संघांमधील चौथ्या सामन्यात पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. बुधवारचा सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्यासाठी ऑसी संघ उत्सुक असला तरी क्लार्क जर खेळू शकला नाही तर त्यांच्या फलंदाजीची बाजू कमकुवत होण्याची शक्यता आहे.
क्लार्क खेळू शकला नाही तर त्याच्याऐवजी संघाचे नेतृत्व जॉर्ज बेलीकडे सोपविले जाणार आहे. क्लार्कऐवजी ग्लेन मॅक्सवेल किंवा मोझेस हेन्रिक्स यांच्यापैकी एकाचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश केला जाईल.