आघाडीस्थानावर असलेल्या यु मुंबा संघाने बंगळुरू बुल्सवर ४५-३४ अशी मात करत प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयाचा षटकार ठोकला. याचप्रमाणे जयपूर पिंक पँथर्स संघाने तिसरा विजय मिळविताना दबंग दिल्ली संघाला ४०-३१ असे हरवले. मुंबा संघाने बंगळुरूविरुद्ध सुरुवातीपासूनच आघाडी राखली होती. पूर्वार्धात त्यांच्याकडे २३-१३ अशी आघाडी होती. त्यांच्याकडून अनुप कुमारने नऊ गुण कमवत सर्वोत्तम चढाईपटूचा मान मिळविला. रिशांक देवडिगाने चढायांचे सात गुण मिळवले. बंगळुरूकडून अजय ठाकूरने चढायांचे आठ गुण तर मनजित चिल्लरला सहा गुण मिळविता आले.
जयपूर संघाने दिल्लीविरुद्ध पूर्वार्धात २१-११ अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी हा सामना ते सहज जिंकतील असे वाटले होते, मात्र उत्तरार्धात दिल्ली संघाच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण खेळ करीत ही आघाडी केवळ एका गुणांपर्यंत कमी केली होती. तथापि, शेवटच्या पाच मिनिटांमध्ये जयपूरच्या खेळाडूंनी धारदार पकडी व खोलवर चढाया करीत ४०-३१ असा विजय मिळविला. त्यांच्याकडून जसवीर सिंग (८ गुण) व मणिंदर सिंग (५ गुण) चमकले. दिल्ली संघाच्या सुरजित नरवालने सात गुण आणि काशिलिंग आडकेने पाच गुण मिळविले.

Story img Loader