* आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव आज
* १०१ क्रिकेटपटूंवर लागणार बोली
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सहाव्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव रविवारी चेन्नईत होणार असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग हे नऊ फ्रँचाजझींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. या लिलावात १०१ क्रिकेटपटूंवर बोली लागणार असून पाँटिंग आणि क्लार्कला २.१ कोटी रुपयांची मूळ किंमत (बेस प्राइस) मिळणार आहे.
हरभजन सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर क्लार्कला विकत घेण्यासाठी मुंबई संघ उत्सुक असेल. गेल्या मोसमात सहारा पुणे वॉरियर्सतर्फे सहा सामने खेळणाऱ्या क्लार्कवर बोली लावण्यासाठी मुंबई आपली झोळी रिकामी करण्याची अपेक्षा आहे. युवराज सिंगने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवल्यामुळे पुणे संघासाठीही कर्णधार म्हणून क्लार्क उत्तम पर्याय आहे. पुण्याकडे ३० लाख अमेरिकन डॉलरची रक्कम शिल्लक असल्यामुळे क्लार्कला विकत घेण्यासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे.
बिग बॅश लीग स्पर्धेत होबार्ट हुर्रिकेन्सतर्फे चमकदार कामगिरी केल्यामुळे पाँटिंगवर सर्वाधिक बोली लागण्याची अपेक्षा आहे. पाँटिंगला कर्णधार आणि सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासाठी हैदराबाद सनरायझर्स (डेक्कन चार्जर्सच्या जागी आलेला संघ) उत्सुक आहे. ‘‘एका मोसमासाठीच खेळाडूंवर बोली लावायची असल्यामुळे पाँटिंगला विकत घेणे आमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. कुमार संगकारा कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत नसल्यामुळे तसेच कॅमेरून व्हाइट हा कर्णधारपदासाठी योग्य पर्याय नसल्याने पाँटिंगला विकत घेणे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल,’’ असे हैदराबाद संघातील अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात उत्तम दर्जाचे वेगवान गोलंदाज असल्यामुळे ते फिरकीपटू अजंठा मेंडिसवर बोली लावतील. चेन्नई सुपर किंग्जचा संघ समतोल असला तरी नवा चेंडू हाताळण्यासाठी ते वेस्ट इंडिजच्या रवी रामपॉलवर बोली लावण्यासाठी उत्सुक आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सकडे ६० लाख अमेरिकन डॉलर इतकी घसघशीत रक्कम शिल्लक असल्यामुळे आपल्या संघासाठी योग्य असे खेळाडू विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध असतील. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने वेळप्रसंगीच खेळाडू करारबद्ध करण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा