चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत महेंद्रसिंग धोनीच्या तगडय़ा चेन्नई सुपर किंग्जसमोर आव्हान असेल ते राजस्थान रॉयल्सचे. चेन्नईने यंदाच्या स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते. पण अखेरच्या साखळी सामन्यात मात्र त्यांना त्रिनिदाद टोबॅगोकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर चारही साखळी सामन्यांमध्ये प्रतिस्पध्र्याना धूळ चारत राजस्थान रॉयल्सने आपल्या दर्जाला साजेशा पद्धतीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघ चांगलेच समतोल असले तरी आपल्या घरच्या मैदानात सलग १२ सामने राजस्थानने जिंकले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरी जिंकून राजस्थान विजयी घोडदौड कायम राखणार की चेन्नई राजस्थानची विजयी मालिका मोडीत काढून अंतिम फेरीत प्रवेश करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चेन्नईची फलंदाजी ही मुख्यत्वेकरून माइक हसी, सुरेश रैना आणि कर्णधार धोनी यांच्यावर अवलंबून असेल. कारण या तिघांनाच स्पर्धेत सातत्याने कामगिरी करता आली आहे. गोलंदाजीमध्ये धोनीकडे जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, अॅल्बी मॉर्केल, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा अशी भेदक गोलंदाजांची फळी आहे.
राजस्थानच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य समन्वय पाहायला मिळतो. कर्णधार द्रविडबरोबर शेन वॉटसन आणि ब्रॅड हॉज यांच्याकडेही चांगला अनुभव आहे, तर अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, केव्हॉन कूपर, स्टुअर्ट बिन्नी आणि अशोक मनेरिया असे युवा शिलेदारही आहेत. तर प्रवीण तांबे आणि राहुल शुक्लासारख्या खेळाडूंनी स्पर्धेत चांगली चमक दाखवली आहे.
चेन्नई आणि राजस्थान हे दोन्ही बलाढय़ संघ शुक्रवारी उपांत्य फेरीत एकमेकांपुढे उभे ठाकले असल्याने जयपूरवासीयांना एका रंजक सामन्याची मेजवानी नक्कीच मिळेल.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : राहुल द्रविड (कर्णधार), स्टुअर्ट बिन्नी, केव्हॉन कूपर, जेम्स फॉल्कनर, ब्रॅड हॉज, विक्रमजीत मलिक, अशोक मनेरिया, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, राहुल शुक्ला, शॉन टेट, प्रवीण तांबे, सिद्धार्थ त्रिवेदी, शेन वॉटसन आणि दीक्षांत याग्निक.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, एस. बद्रिनाथ, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, माइक हसी, इम्तियाझ अहमद, रवींद्र जडेजा, अॅल्बी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, मोहित शर्मा आणि मुरली विजय.
स्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम.
वेळ : रात्री ८ वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार क्रिकेट एचडी वाहिनीवर.