रांचीच्या घरच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी पेश केलेल्या अदाकारीमुळे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पध्रेकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे. ‘माही’ने आठ षटकारांची चौफेर आतषबाजी करीत फक्त १९ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ६३ धावांचे कवित्व अद्याप टिकून आहे. त्यामुळे गुरुवारी दुबळ्या ब्रिस्बेनला हरवून विजयाच्या हॅट्ट्रिकसह उपांत्य फेरी गाठण्याचे मनसुबे त्यांनी रचले आहेत.
चॅम्पियन्स लीगच्या गुणतालिकेकडे पाहिले तरी चेन्नई आणि ब्रिस्बेन या दोन्ही संघांचे स्थान स्पष्ट होते. ‘ब’ गटात चेन्नईचा संघ दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर ब्रिस्बेन तळाच्या स्थानावर आहे. या वर्षी आयपीएल उपविजेतेपद काबीज करणाऱ्या चेन्नईला चॅम्पियन्स लीगचे कडवे दावेदार मानण्यात येत आहे.
गुरुवारी कर्णधार धोनीच्या साथीने सुरेश रैनाने ८४ धावांची खेळी साकारून साऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. याशिवाय माइक हसी आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नइने २०२ धावा उभारल्या होत्या. त्यामुळेच भक्कम फलंदाजीची फळी असलेल्या चेन्नईकरिता ब्रिस्बेनला नामोहरम करणे जड जाणार नाही.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स-२.
आव्हान टिकविण्यासाठी धडपड
रांची :एक विजय आणि एक पराजय.. हीच सनरायजर्स हैदराबाद आणि टायटन्स या दोन्ही संघांची चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील आतापर्यंतची पुंजी.. उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न शाबूत ठेवण्यासाठी या दोन्ही संघांनी शनिवारी होणारी लढत जिंकण्याची आवश्यकता आहे. दोन्ही संघांच्या खात्यावर चार गुण जमा असल्यामुळे या सामन्यातील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. टायटन्सने पहिल्या समान्यात चेन्नईकडून हार पत्करली, मात्र दुसऱ्या सामन्यात ब्रिस्बेनवर विजय नोंदवत आपले खात उघडले.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स-२

Story img Loader