शहरामध्ये होणाऱ्या अनधिकृत स्पर्धामध्ये संलग्न क्लब्ज आणि खेळाडूंनी सहभागी होऊ नये, असा नवीन आदेश मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) काढला आहे. एमसीएने संयुक्त सचिन नितीन दलाल आणि पी. व्ही. शेट्टी यांचे स्वाक्षरी असलेले एक पत्रक जवळपास ३५०पेक्षा अधिक संलग्न क्लब्जना पाठवले आहे. या पत्रामध्ये अनधिकृत स्पर्धामध्ये जर क्लब्ज आणि खेळाडू सहभागी झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
‘‘अनधिकृत स्पर्धामध्ये क्लब्ज आणि खेळाडूंनी सहभागी होत असल्याचे आमच्या पाहण्यात आले आहे. तुम्हाला विनंती आहे की, यापुढे स्पर्धेत सहभागी होताना या स्पर्धेला मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता आहे किंवा नाही, हे तपासून घ्यावे. जर मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत स्पर्धामध्ये तुम्ही सहभागी झालात तर तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’’ असे एमसीएने काढलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. संघटनेच्या मान्यतेशिवाय होणाऱ्या अनधिकृत स्पर्धाना प्राधान्य देण्यात येऊ नये आणि त्यामध्ये संलग्न क्लब्ज व क्रिकेटपटूंनी सहभागी होऊ नये, यासाठी एमसीएने ही सूचना काढली आहे.
‘‘आम्हाला काही जणांकडून तक्रारी आल्यामुळे आम्ही हे पाऊल कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये उचलले आहे. ज्या स्पर्धा प्रामाणिकपणे घेतल्या जातात त्यांच्याविरोधात आम्ही नाही. कोणत्या एका स्पर्धेवर डोळा ठेवून हे करण्यात आलेले नाही. जर परवानगी नसेल तर स्पर्धा अनधिकृत ठरते. त्याचबरोबर या स्पर्धा आणि एमसीएच्या स्पर्धा एकाच वेळेला होत असतात, त्यामुळे मैदानांचा प्रश्न उद्भवतो. एमसीएचे नियम डावलून काही स्पर्धा सुरू आहेत, पण या स्पर्धेतील खेळाडू, अधिकारी आणि मैदाने एमसीएशी संलग्न आहेत. जर या स्पर्धामध्ये काही घडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार,’’ असा प्रश्न एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.