मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून सुरू झाला आहे. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. मुंबई आपले ४२वे विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे तर, स्पर्धेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेशने दुसऱ्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी मध्य प्रदेशच्या संघाने अतोनात कष्ट केले आहेत आणि याचे सर्वाधिक श्रेय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना जाते.

ज्या मुंबईच्या संघाविरुद्ध चंद्रकांत पंडित यांचा संघ दोन हात करत आहे एकेकाळी त्याच मुंबई संघाचे तेदेखील एक भाग होते. त्यांनी सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटमधील बारकावे शिकून घेतलेले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळलेल्या १३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी आठ हजार २०९ धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये २२ शतके आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. पंडित यांनी भारतीय संघासाठी पाच कसोटी आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते १९८६च्या विश्वचषक संघाचा भाग होते.

हेही वाचा – IND vs ENG : लंडनमध्ये पोहचलेल्या विराट कोहलीलाही झाला होता करोना! माध्यमांमध्ये रंगली चर्चा

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत १०१५-१६ मध्ये मुंबई, २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये विदर्भाच्या संघाला रणजी विजेते बनवलेले आहे. अशा या यशस्वी प्रशिक्षकाच्या हाती दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचा संघ आला. त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी मध्य प्रदेशचा संघ साखळी फेरीतच बाद झाला. त्यानंतर हंगामात म्हणजेच यावेळी मध्य प्रदेशच्या संघाने जोरदार मुसंडी मारली. सुमारे दीड कोटी रुपयांच्या वार्षिक पगारावर नियुक्त झालेल्या पंडित यांनी दोन वर्षांत संघाला अंतिम सामन्यात पोहचवले आहे.

चंद्रकांत पंडित यांनी संघाच्या शिस्तीवर सर्वाधिक भर दिला. खेळाडूंच्या येण्या-जाण्याची वेळ असो, गणवेश असो किंवा मग सांघिक वागणूक असो, पंडित यांना किंचितही बेशिस्तपणा सहन केला नाही. त्यांच्या एका फोनवर सगळा संघ सरावासाठी मैदानावर असायचा. खेळाडूंची सतर्कता तपासण्यासाठी एकदा तर त्यांनी रात्री १२ वाजता खेळाडूंना मैदानावर बोलावले होते. जर एखाद्या खेळाडूला मैदानावर येण्यास उशीर झाला तर त्याला संपूर्ण सराव सत्रातून बाहेर केले जाई. शिवाय जर एखाद्या खेळाडूला मैदानातून बाहेर निघताना उशीर झाला तर संघ त्याला तिथेच सोडून निघून जायचा.

हेही वाचा – IND vs ENG: रोहित आणि विराटच्या चुकीमुळे भारतीय संघाला मिळाली वॉर्निंग! का ते वाचा

संघातील जेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नाहिसा करण्यासाठी चंद्रकांत पंडित यांनी ‘दादा-भैय्या’ अशा संबोधनावर बंदी घातली होती. प्रत्येकजण एकमेकांना नावाने हाक मारायचा. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पंडित यांनी आपल्या खेळाडूंना सैन्याच्या शाळेत नेऊन प्रशिक्षण दिले. मध्य प्रदेशातील महू येथील सैन्याच्या शाळेत खेळाडूंना मानसिकदृष्ट्या कणखर बनवले. त्यासाठी लष्कराची विशेष परवानगी घेण्यात आली होती.

चंद्रकांत पंडित यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात संघासाठी ४०५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले. अगदी पावसातही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंडित यांनी मजबूत संघ तयार करण्यासाठी विभागीय सामने आणि चाचण्यांद्वारे खेळाडूंचा शोध घेतला. काही खेळाडूंसाठी तर त्यांनी निवडकर्त्यांशीही वाद घातला होता.

एकूण चंद्रकांत पंडित यांनी अथक प्रयत्न करून मध्य प्रदेशाचा सध्याच्या रणजी संघाची बांधणी केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या संघाच्या यशाचे श्रेय त्यांना दिले जात आहे.

Story img Loader