IND vs NED, World Cup 2023: भारतीय संघाने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. आपले पहिले आठ सामने जिंकून, टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना नेदरलँडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने संघाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आणि सांगितले की, “त्याच्या शानदार खेळामुळे टीम इंडियाने एकतर्फी सामने जिंकले.”
राहुल द्रविडने कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना सांगितले की, “२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर एका कर्णधार कसा असावा याचे उत्तम उदाहरण स्पष्ट केले आहे. त्याने टीम इंडियाचे उत्तम नेतृत्व केले. रोहितने आपल्या आक्रमक वृत्तीने टॉप ऑर्डरवर जो प्रभाव पाडला आहे, तो अद्वितीय आहे. रोहित शर्मा जरी २०११चा विश्वचषक स्पर्धेला मुकलेला असला तरी त्याने २०२३मध्ये संघाचे नेतृत्व करण्यापर्यंत बराच पल्ला गाठला आहे. मायदेशातील विश्वचषकात रोहितने स्वत:ला सिद्ध करत संघाला तसे स्वातंत्र्य दिले, त्यामुळेच भारताने सलग आठ सामने जिंकले आहेत.” भारताला बंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवायची आहे.
२००३मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकले होते. त्या विश्वचषकातील त्यांचा सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम मोडण्यापासून रोहित ब्रिगेड फक्त एक विजय दूर आहे. द्रविड म्हणाला, “तो कर्णधार झाल्यापासून संघाने विलक्षण कामगिरी केली आहे. रोहित असा खेळाडू आहे की ज्याला संघ आणि कोचिंग स्टाफचा आदर मिळाला आहे. तो ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व करतो, ते पाहून खूप आनंद होतो. मला वाटते की तो खरोखरच हा विश्वचषक जिंकण्यासाठी पात्र असलेला कर्णधार आहे. एक माणूस म्हणून त्याने संघातील सर्व खेळाडूंना समजून घेतले. संघाला मिळालेल्या सर्व यशामागे त्याचा हात आहे. तो एक खेळाडू म्हणून असच पुढे खेळत राहावा अशी आम्हा सर्वांचीचं इच्छा आहे. आशा आहे की टीम इंडियाची शानदार कामगिरी अशीच पुढे सुरु राहील.”
“कर्णधाराने तसे केले नसते तर आक्रमक शैलीचे अनुसरण करणे शक्य झाले नसते,” असे सांगून राहुल द्रविडने सलामीवीर म्हणून रोहित शर्माने अवलंबलेल्या आक्रमक फलंदाजीचे कौतुक केले. रोहित शर्मा भारताला उत्कृष्ट सुरुवात करून देत आहे आणि तो विरोधी संघाच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव आणत आहे. रोहितने १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ४४२ धावा केल्या आहेत. कर्णधार निःस्वार्थपणे त्याचा आक्रमक दृष्टिकोन ठेवत संघाला चांगली सुरुवात करून देत आहे.
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध ८४ चेंडूत १३१ धावा केल्या, ज्यामुळे भारताला २७३ धावांचे लक्ष्य पार करता आले. दुसरीकडे ६३ चेंडूत ८६ धावांच्या खेळीमुळे भारताला पाकिस्तानसमोरील १९२ धावांचे लक्ष्य सहज गाठण्यात मदत झाली. धरमशाला येथे झालेल्या आणखी एका कठीण सामन्यात रोहितने ४५ धावांची आक्रमक खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले.
मुख्य प्रशिक्षक द्रविडने एक गोष्ट स्पष्ट केली की, “त्याने खेळलेल्या एकही खेळीपैकी काहीच सोपे नव्हते, परंतु रोहित शर्माने एक ठोस सुरुवात करत भारतासाठीचे आव्हान सोपे केले. रोहित नक्कीच एक उत्तम कर्णधार आहे, यात काही शंका नाही. मला वाटते की त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या नेतृत्वाने एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्याने आम्हाला चांगली सुरुवात दिल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवरील दबाव कमी झाला, एकप्रकारे त्याने प्रत्येक खेळ आमच्यासाठी सोपा करून दिला. कधीकधी लोक असे करतात पण प्रत्येक सामन्यात करणे कठीण असते.”
द्रविड म्हणाला की, “असे काही सामने झाले जे आमच्यासाठी खूप कठीण होते, परंतु त्याने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यामुळे आम्हाला ते सामने जिंकण्यात खूप मदत झाली. एक प्रशिक्षक म्हणून जेव्हा मी विचार करतो आणि हे सर्व पाहतो तेव्हा अशा खेळीकडे विजयामुळे कधीकधी दुर्लक्ष होते. अशा खेळीचे महत्त्व उशिराने लक्षात येते.” नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही, कारण त्यांचा उपांत्य फेरीचा सामना बुधवारी, १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.