Argument between India and Pakistan players: एसएएफएफ चॅम्पियनशिप २०२३ ची सुरुवात बंगळुरू येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने झाली. श्री कांतीराव स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. कर्णधार सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ४-० असा मोठा विजय मिळवला. भारताची स्पर्धेतील ही अपेक्षित सुरुवात ठरली. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडच्या सहा सामन्यांत मिळवलेला हा पाचवा विजय ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या १६ मिनिटांतच भारतीय संघाने दोन गोल केले होते. मात्र, पूर्वार्ध संपण्याच्या बेतात असताना भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये वादावादी झाली. वास्तविक, भारताचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या एका चुकीमुळे तणाव वाढला. पाकिस्तानचा अब्दुल्ला इक्बाल जेव्हा थ्रो-इनची तयारी करत होता, तेव्हा अत्यंत अनुभवी प्रशिक्षक स्टिमॅकने हस्तक्षेप केला. स्टिमॅकने खेळाडूकडून चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी खेळाडू आणि कोचिंग स्टाफने त्याचा निषेध केला.

भारतीय प्रशिक्षकाला रेड कार्ड दाखवले –

त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वादावादी झाली. पंच प्रज्वल छेत्री आणि इतर सामना अधिकाऱ्यांना दोन्ही संघांना वेगळे करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. भारतीय कर्णधार सुनील छेत्री आणि पाकिस्तान फुटबॉल संघाचा कर्णधार हसन बशीर यांनीही वातावरण शांत करण्यास मदत केली. यानंतर रेफ्रींनी इगोर स्टिमॅक आणि भारतीय मॅनेजरला रेड कार्ड दाखवले.

विरोधी खेळाडूच्या कार्यात हेतुपुरस्सर अडथळा आणल्याबद्दल फुटबॉलच्या नियमानुसार ही शिक्षा आहे. रेफ्री प्रज्वल छेत्री यांनी भारतीय खेळाडू संदेश छिंगन आणि पाकिस्तानी खेळाडू रईस नबी आणि पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक शहजाद अन्वर यांनाही येलो कार्ड दाखवले. पूर्वार्धानंतर इगोर स्टिमॅक मैदानावर थांब शकला नाही आणि त्याच्या जागी महेश गवळी आला. त्यानंतर महेश गवळीने पुढील कार्यभार सांभाळला.

सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा चौथा खेळाडू ठरला –

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर सुनील छेत्रीने हॅट्ट्रिक केली. सुनील छेत्रीने सामन्याच्या ६व्या, १६व्या आणि ७३व्या मिनिटाला गोल केले. यातील एक सहाव्या मिनिटाला मैदानी गोल होता, तर नंतरचे दोन गोल पेनल्टीतून झाले. आता सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. छेत्रीच्या हॅट्ट्रिकपूर्वी त्याच्या एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला. चाहत्याने सुनील छेत्रीचे नाव असलेला टी-शर्ट घातला होता.

हेही वाचा – ENG vs AUS: रिकी पाँटिंगने इंग्लंड संघावर उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, “बेन स्टोक्सचा डाव…”

चाहत्याने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला मिठी मारली. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ मैदानाबाहेर काढले. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध ४-० असा विजय मिळवला. संघासाठी चौथा गोल उदांता सिंगने सामन्याच्या ८०व्या मिनिटाला केला. भारताचा पुढील सामना २४ जून रोजी नेपाळशी त्याच मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coach igor stimac was red carded for obstructing the opposing teams play and ind and pak players clashed vbm