भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करत १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम सामन्यात दण्यात प्रवेश केला आहे. मात्र ऑन फिल्डबरोबरच ऑफ फिल्ड असताना राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाचा हा परिणाम असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. द्रविड सरांचा हा संघ खूपच शिस्तप्रिय असल्याचे मागील सामन्यामध्ये दिसून आले. द्रविड वेळोवेळी या तरुण खेळाडूंना मोलाचे सल्ले देत आला आहे. आयपीएल लिलावाकडे लक्ष न देता विश्वचषक स्पर्धेवर लक्ष देण्याचा सल्ला त्याने खेळाडूंना दिलेला. केवळ आणि केवळ खेळावर या मुलांचे लक्ष केंद्रित रहावे म्हणून द्रविडने आणखीन एक नियम आपल्या संघासाठी घालून दिला आहे. एकाग्र चित्ताने केवळ खेळातील बारकाव्यांवर लक्ष्य देऊन खेळात सुधारणा करता यावी या उद्देशाने द्रविडने या संघातील खेळाडूंवर मोबाईल बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे. विश्वचषकाचा अंतीम सामना होईपर्यंत या संघातील कोणताही खेळाडू आपला मोबाईल वापरणार नाही असा नियमच द्रविडने बनवला आहे.

‘स्पोर्टवाला’ या वेबसाईटला शिवम मावी या खेळाडूचे वडील पंकज मावी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ही बाब समोर आली. अंतीम सामना होईपर्यंत राहुल सरांनी आमच्या मोबाईल वापरावर बंदी घालती आहे अशी माहिती शिवमने आपल्या बाबांना बोलताना दिली. आम्ही शिवमशी रविवारी बोललो. मात्र त्यावेळी त्याने आता आपण फायनल नंतर बोलू असे सांगितले. अंतिम आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांआधी द्रविडने सर्व खेळाडूंना मोबाईल वापरू नये असे सांगितले असल्याचे पंकज मावी म्हणाले. कुटुंबातील सदस्यांचे आणि प्रसारमाध्यमांच्या सततच्या फोनमुळे खेळाडूंचे खेळावर लक्ष राहणार नाही अशी भिती असल्याने द्रविडने ही बंदी आणल्याची माहिती शिवमने आपल्या वडीलांना फोनवरून दिली.

सध्या या खेळाडूंना नो मोबाईल फोन या नियमाबरोबर जुळवून घेणं थोडं कठीण जात असलं तरी अंतिम सामना जिंकण्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने द्रविडचा हा निर्णय योग्यच असल्याचे म्हणावे लागेल. उद्या म्हणजेच शनिवारी भारतीय वेळेनुसार रात्री अडीच वाजता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना रंगणार आहे.

Story img Loader