एजबस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा वगळता इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये द्रविडने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजांना वारंवार अपयश येणे ही चिंतेची बाब आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांसोबत बैठक घेणार असल्याचे द्रविडने सांगितले. द्रविडच्या या वक्तव्यामुळे संघातील काही खेळाडूंच्या चिंतेत वाढ झाल्याची शक्यता आहे.
एजबस्टनमधील भारताच्या पराभवाचे विश्लेषण कसे कराल? असे द्रविडला विचारण्यात आले होते. त्याने दोन दिवसांत सुरू होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा संदर्भ उत्तर दिले की, ‘व्यस्त वेळापत्रकात आमच्याकडे इतका विचार करायला वेळ नाही. पण, या कामगिरीचा विचार करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. प्रत्येक सामना हा आमच्यासाठी एक धडा असतो. त्यातून आम्ही काही ना काही शिकतो. आम्ही कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात चांगली फलंदाजी का करू शकलो नाही. चौथ्या डावात १० बळी का घेऊ शकलो नाही याचा विचार करू.’
हेही वाचा – WTC Standings: एजबस्टन कसोटीतील ‘ही’ चूक भारताला पडली महागात; पाकिस्तानने केले ओव्हरटेक!
भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात आणखी सहा सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने भारतीय उपखंडात आहेत. त्यापूर्वी, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासोबत बसून चुकांचे विश्लेषण करण्याची योजना द्रविड आखत आहे. द्रविड म्हणाला, ”काही फलंदाजांचा सध्या फॉर्म चिंतेचा विषय आहे. यावर्षात आतापर्यंत गमावलेल्या कसोटी सामन्यांमध्ये तिसऱ्या डावात फलंदाजी ढेपाळली. या स्थितीमध्ये नक्कीच बदल करावे लागणार आहेत.”
राहुल द्रविडच्या या वक्तव्यामुळे सुमार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. राहुल द्रविडच्या देखरेखीखाली भारतीय संघ परदेशात आपले शेवटचे तीन कसोटी सामने गमावले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांचा आणि एजबस्टन कसोटी सामन्याचा समावेश आहे. भारताने जोहान्सबर्ग येथे आपल्या दुसऱ्या डावात २६६, केपटाऊनमध्ये १९८ आणि एजबस्टनमध्ये २४५ धावा केल्या होत्या. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला २४०, २१२ आणि ३७८ धावांचे मोठे लक्ष्य राखण्यात अपयश आले.