हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी पहाटे हा सामना रंगणार आहे. मध्यंतरी महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर मुंबईकर रमेश पोवारची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. रमेश पोवार यांच्या येण्यामुळे संघाला फायदा झाल्याचं वक्तव्य कर्णधार हरमनप्रीत कौरने केलं आहे.
“प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या येण्यामुळे संघाला बराच फायदा झाला आहे. आता आम्ही रणनितीमध्ये बदल केला असून मोठं लक्ष्य गाठण्याचं ध्येय आम्ही बाळगलं आहे. या सर्व गोष्टींचं श्रेय प्रशिक्षक रमेश पोवार यांचं आहे, कारण ज्या क्षणापासून ते रुजु झाले आहेत आमच्या दृष्टीकोनात चांगला बदल झाला आहे.” उपांत्य सामन्याआधी पत्रकारांशी बोलत असताना हरमनप्रीत कौरने पोवार यांचं कौतुक केलं.
याआधी वन-डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडने भारतावर 9 धावांनी मात केली होती. उद्याच्या सामन्यात हा पराभव विसरून सर्वोत्तम कामगिरी करण्याचं ध्येय भारतीय महिलांनी ठेवलं आहे. या विश्वचषकात देखील भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या मजबूत संघांना सहजपणे हरवत अत्यंत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या प्रकारात भारतीय संघ अधिक मजबूत असल्याने भारताला या सामन्याचा अडथळा पार करीत अंतिम फेरी गाठता येईल, असा संघातील खेळाडूंना विश्वास आहे.