कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीने प्रशिक्षक रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड केली. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात रवी शास्त्री भारतीय संघात प्रवेशासाठीचे निकष खडतर करणार असल्याचं समजतंय. भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठची खेळाडूंना आधी यो-यो फिटनेस टेस्ट द्यावी लागते. यामध्ये किमान १६.१ गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळत. बंगळुरु टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक रवी शास्त्री यो-यो फिटनेस टेस्टचा निकष किमान १७ गुणांचा करण्याच्या तयारीत आहेत.
यासंदर्भात रवी शास्त्री लवकरच बीसीसीआय आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. आगामी काळातील स्पर्धा लक्षात घेता, खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे योग्य आणि फिटनेस कायम राखणाऱ्या खेळाडूंनाच संघात जागा मिळण्यासाठी रवी शास्त्री निकष खडतर करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. १५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी हे निकष लागू केले जाण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रवी शास्त्रींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास, कसोटी संघासाठीची निवड नवीन निकषांनुसार केली जाण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा – प्रशिक्षक रवी शास्त्रींचं इन्क्रीमेंट, वार्षिक मानधनात तब्बल २० टक्के वाढ