बीजिंग : अमेरिकेच्या कोको गॉफने या वर्षातील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करताना चीन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीपर्यंत पोहचताना सलग तीन सामन्यांत पहिला सेट गमवावा लागलेल्या गॉफने अंतिम फेरीत मात्र एकतर्फी विजय नोंदवताना विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात कोकोने कॅरोलिना मुचोवाचे आव्हान ६-१, ६-३ असे संपुष्टात आणले. पहिल्या तीन सामन्यांत दोन तासांपर्यंत खेळावे लागलेल्या कोकोने अंतिम लढत अवघ्या १ तास १६ मिनिटांत जिंकली. कोकोचे हे या वर्षातील दुसरे आणि कारकीर्दीतले आठवे विजेतेपद ठरले. यातील सात विजेतीपदे कोकोने हार्डकोर्टवर मिळवली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच टेनिसपटू ठरली. नवे प्रशिक्षक मॅट डेली यांच्या मार्गदर्शनाखाली कोको प्रथमच जिंकली. उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकन विजेती अरिना सबालेन्का आणि उपांत्य फेरीत ऑलिम्पिक विजेती क्विनक्वेन झेंग अशा मतब्बर खेळाडूंना हरवून अंतिम फेरी गाठणारी मुचोवा विजेतेपदाच्या लढतीत कोकोसमोर निष्प्रभ ठरली.
पहिला सेट अवघ्या २९ मिनिटांत जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटला मात्र कोकोने संथ सुरुवात केली. तीन डबल फॉल्टमुळे कोकोने सुरुवातीलाच आपली सर्व्हिस गमावली. मुचोवाने २-० अशी आघाडी घेतली. अर्थात, कोकोने लगोलग ब्रेकची संधी साधून लय मिळवली आणि नंतर मागे वळून बघितले नाही.
एका सेटच्या पिछाडीनंतर सिन्नेरचा विजय
शांघाय : अग्रमानांकित यानिक सिन्नेरने एका सेटच्या पिछाडीनंतर अर्जेंटिनाच्या टोमार मार्टिन एचेव्हेरीचे आव्हान तीन सेटमध्ये परतवून लावत शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश केला. सिन्नेरने तिसऱ्या फेरीत एचेव्हेरीचे आव्हान ६-७ (३-७), ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले. स्पर्धेत दुसऱ्या फेरीची लढत सहज जिंकल्यानंतर लागलीच कोर्टवर उतरावे लागल्याचा सिन्नेरच्या खेळावर परिणाम दिसून आला. सिन्नेरचा हा कारकीर्दीमधील २५१वा विजय ठरला.