लंडन : अमेरिकेची दुसऱ्या मानांकित कोको गॉफने आपली लय कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. यासह महिला एकेरीत ओन्स जाबेउर व अग्रमानांकित इगा श्वीऑटेकनेही पुढची फेरी गाठली. पुरुष एकेरीत स्टेफानोस त्सित्सिपास, कार्लोस अल्कराझ,मेदवेदेवने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

महिला एकेरीत गॉफने आपल्या दुसऱ्या सामन्यात रोमानियाच्या एन्का टोडोनीला ६-२, ६-१ अशा फरकाने पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गॉफने टोडोनीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पोलंडच्या श्वीऑटेकनेही अमेरिकेच्या सोफिआ केनिनला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत आगेकूच केली. तर, ट्युनिशियाच्या जाबेउरने जपानच्या मोयुका उचिजिमावर ६-३, ६-१ अशा फरकाने विजय नोंदवला.

हेही वाचा >>>टी २० विश्वविजेता भारतीय संघ दिल्लीत दाखल, चाहत्यांकडून जोरदार स्वागत

पुरुष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या तिसऱ्या मानांकित कार्लोस अल्कराझने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सांदर वुकिचला ७-६ (७-५), ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवले. तर, डॅनिल मेदवेदेवने फ्रान्सच्या अॅलेक्झाडर म्युलेरवर ६-७ (३-७), ७-६ (७-४), ६-४, ७-५ असा विजय मिळवला. त्सित्सिपासने जपानच्या टारो डॅनिएलवर ७-६ (७-५), ६-४, ७-५ असा विजय साकारला. तर,इटलीच्या फॅबिओ फोगनिनीकडून नॉर्वेच्या कॅस्पर रूडला ६—४, ७—५, ६—७ (१—७), ६—३ असे पराभूत व्हावे लागले.