इशांत शर्माचे तीन बळी गुरुवारी भारतासाठी महत्त्वाचे ठरले. त्याच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली, परंतु इशांत स्वत:ला वेगवान माऱ्याच्या नेतृत्वस्थानी मानत नाही. सांघिक कामगिरीमुळे हा विजय मिळाल्याचे त्याचे म्हणणे आहे.
गुरुवारी भारताने श्रीलंकेवर आठ विकेट राखून आरामात विजय मिळवला आणि रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केले. इशांत ३३ धावांत ३ बळी घेत सामनावीर किताब पटकावला. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इशांत म्हणाला की, ‘‘खेळपट्टी अतिशय वेगवान होती आणि चेंडूला छान उसळी मिळत होती. मला योग्य लय सापडली आणि चांगली गोलंदाजी केली, याचा मला आनंद होतो आहे. योग्य टप्प्यावर चेंडू टाकणे, हे महत्त्वाचे असते. मला ते शक्य झाले, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘दररोज अशा प्रकारे उत्तम गोलंदाजी करायला, मी देव नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या मदतीने आणि आमच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्य चोख बजावतो आहे. याचप्रमाणे पाच क्षेत्ररक्षक वर्तुळात असताना गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते, याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे आम्ही वैविध्य आणि अन्य गोष्टींवर मेहनत घेतली होती. परंतु त्याचे फळ आम्हाला मिळाले.’’
उंच वेगवान गोलंदाज इशांतने सांघिक कामगिरीला श्रेय देताना सांगितले की, ‘‘कामगिरी चांगली झाली, ही भावना खूप सुखावणारी असते. मी स्वत:ला वेगवान गोलंदाजीचा कर्णधार मानत नाही. कारण एक संघ म्हणून आम्ही सर्वानी अतिशय मेहनत घेतली आहे. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने आपल्यापरीने सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. ही सांघिक जबाबदारी असते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा