कोलंबियाचा संघ चांगल्या कामगिरीसह यंदाच्या विश्वचषकात दमदार आगेकूच करत आहे. लौकिकाला साजेसा खेळ होत असल्याने त्यांचे चाहतेही खूश आहेत. मात्र सुखकारक वर्तमानात कोलंबियाचा संघ इतिहासातल्या एका दुर्दैवी घटनेला विसरलेला नाही. एका माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या आंद्रेस एस्कोबार याचे स्मरण करायला कोलंबियाचे खेळाडू विसरलेले नाहीत.
१९९४ साली अमेरिकेत झालेल्या विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या लढतीत कोलंबियाचा बचावपटू आणि कर्णधार एस्कोबारकडून स्वयंगोल झाला होता. या पराभवाने कोलंबियावर साखळी गटातच बाद होण्याची नामुष्की ओढवली. या पराभवाने संतप्त झालेल्या चाहत्याने त्याच रात्री एस्कोबेरची रेस्टॉरंटच्या वाहनतळामध्ये हत्या केली.
या नृशंस घटनेने हादरलेल्या फुटबॉल विश्वाने एस्कोबारची हत्या करणाऱ्या व्यक्तीचा जोरदार निषेध केला होता. संपूर्ण जगभरातून एस्कोबारला आदरांजली वाहण्यात आली होती. कोलंबियन लीग स्पर्धेच्या सामन्यात आजही प्रत्येक सामन्यापूर्वी एस्कोबारचे स्मरण केले जाते. त्याच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी एक प्रार्थना म्हटली जाते.
विश्वचषकातून झटपट माघारीसाठी कारणीभूत ठरलेल्या एस्कोबारवर उत्तेजकांचा व्यापार करणाऱ्या गुंडांनी पाठीवर वार केले होते. कोलंबियाच्या पराभवामुळे जुगार व्यवसायाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. संघाच्या विजयात नेहमीच योगदान देणाऱ्या आणि शिस्तबद्ध खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या एस्कोबारला स्वयंगोल केल्याची मोठी शिक्षा अशा पद्धतीने भोगावी लागली.
यंदा चांगली कामगिरी करत कोलंबियाने बाद फेरी गाठली आहे. जेतेपदावर कब्जा करत आपल्या सच्च्या चाहत्यांना अनोखी भेट देण्याचा कोलंबियाच्या संघाचा प्रयत्न आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2014 रोजी प्रकाशित
कोलंबियाच्या खेळाडूंकडून आंद्रेस एस्कोबारचे स्मरण
कोलंबियाचा संघ चांगल्या कामगिरीसह यंदाच्या विश्वचषकात दमदार आगेकूच करत आहे. लौकिकाला साजेसा खेळ होत असल्याने त्यांचे चाहतेही खूश आहेत.
First published on: 24-06-2014 at 12:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colombia remembers andres escobar