भारताचे एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्री यांनी इंडोनेशियाविरुद्ध एप्रिल महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन केले. मात्र दुहेरीतील दिग्गज महेश भूपती आणि त्याचा सहकारी रोहन बोपण्णा यांच्यावर निवड समितीने पुन्हा दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघातील भूपतीची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. आशिया-ओशियाना गटातील प्लेऑफ सामन्याकरिता संघ निवड करण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीची नवी दिल्लीत शनिवारी बैठक झाली. निवड समितीने सोमदेव, युकीसह सनम सिंग आणि सर्वात अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस यांची भारतीय संघात निवड केली आहे. निवड समितीने विजयान्त मलिक आणि एन. श्रीराम बालाजी यांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच ५ ते ७ एप्रिलदरम्यान बंगळुरू येथे होणाऱ्या या लढतीसाठी राम कुमार रामनाथन आणि अर्जुन काढे यांची सरावाकरिता निवड करण्यात आली आहे. दुहेरीत पेससह सनम सिंग कोर्टवर उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, एस. पी. मिश्रा यांनाच भारतीय संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले असून झीशान अली हे भारताचे प्रशिक्षक असतील. अखिल भारतीय टेनिस महासंघाविरुद्ध (एआयटीए) देशातील ११ अव्वल
खेळाडूंनी बंडाचे निशाण उगारले होते. त्यामुळे आशिया-ओशियाना गटातील दक्षिण कोरियाविरुद्धच्या पहिल्या लढतीत भारताला १-४ अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले ते. खेळाडूंच्या काही मागण्या एआयटीएने मान्य केल्यानंतर टेनिसपटूंनी माघार घेतली आणि संघनिवडीसाठी आपण उपलब्ध असल्याचे जाहीर केले.
सोमदेव, युकीचे भारतीय संघात पुनरागमन
भारताचे एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्री यांनी इंडोनेशियाविरुद्ध एप्रिल महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन केले.
First published on: 24-02-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comback of somdev yuki in indian team