मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि खेळाडू अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग उत्सुक आहे. चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतल्याचा आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धा संपवून मी आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झालो आहे, असे पॉन्टिंगने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘व्यग्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यामुळे मला ट्वेन्टी-२० लीग स्पर्धावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळाला. व्यग्र वेळापत्रकामुळेच मला आयपीएलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात खेळता आले नव्हते. आता माझ्याकडे फारशा जबाबदाऱ्या नाहीत. त्यामुळेच मी आता अन्य क्रिकेटवर लक्ष देणार आहे. आयपीएलनंतर मी दोन महिने सरे संघाकडून त्यानंतर एक महिना कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणार आहे. या दोन महिन्यांत मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम खेळाडू आणि कर्णधार बनण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी बराच काळ माझ्यावर होती. त्या अनुभवाचा फायदा मी मुंबईला उठवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’
‘‘वर्षांनुवर्षे सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगसारख्या खेळाडूंविरुद्ध खेळल्यानंतर आता त्यांच्यासारख्या महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राईट तसेच अनिल कुंबळे या मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईचा संघ तगडा असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. पहिल्या मोसमाचा अपवाद वगळता आयपीएलमध्ये खेळता आले नसले तरी मी आयपीएल आणि भारतातल्या मालिकांचा कायम आढावा घेत आलोय. भारतात खेळण्याचा अनुभव असल्यामुळे मला फारशी अडचण जाणवणार नाही. मुंबईची कामगिरी या मोसमात चांगली होईल, अशी आशा आहे,’’ असेही पॉन्टिंगने सांगितले.

‘मन्कीगेट’ प्रकरणाचा फरक पडणार नाही!
ऑस्ट्रेलियात घडलेल्या ‘मन्कीगेट’ प्रकरणाचा कोणताही फरक मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंगरूममध्ये पडणार नाही. त्या प्रकरणानंतर आम्ही काही महिन्यांतच मित्र झालो होतो. हरभजन सिंग आणि सचिन तेंडुलकर या दोघांशीही मी आता चर्चा केली असून मुंबई इंडियन्स संघात आम्ही एक आहोत, अशी आम्हा सर्वाचीच भावना आहे, असे रिकी पॉन्टिंगने स्पष्ट केले.

Story img Loader