एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक साजरे कऱणाऱया भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन, सेहवागनंतर आपले नाव कोरणाऱया रोहितने द्विशतकाची किमया दुसऱयांदा साकारली आहे. पण, यावेळी रोहितची खेळी विश्वविक्रमी ठरली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावा रचणाऱया विरेंद्र सेहवागच्या २१९ धावांचा विक्रम मोडीत काढत रोहीत शर्माने २६४ धावांची ऐतिहासिक खेळी रचून सर्वाधिक धावांच्या विक्रमाला नवी उंची गाठून दिली आहे.
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघात स्थान न मिळवू शकलेल्या रोहीतने चौथ्या सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं केलं. या सामन्यात विक्रमी २६४ धावा ठोकून रोहितने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. सुरूवातीपासूनच सुयोग्य फटक्यांच्या नजाकतीने रोहित आपले ‘इरदे नेक’ असल्याचे दाखवून देत होता. विराट कोहलीनेही कर्णधारी खेळी करून रोहितला ६६ धावांची साथ दिली. कोहली बाद झाल्यानंतरही दबावाखाली न खेळता रोहितने आपली फटकेबाजी सुरू ठेवून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. रोहितच्या फलंदाजीसमोर श्रीलंकेचे सर्व गोलंदाज निष्प्रभ ठरताना दिसले. गोलंदाजीत सतत बदल करण्याचा श्रीलंकेचा फंडा देखील रोहितला रोखून धरू शकत नव्हता आणि आपली स्फोटक फलंदाजी कायम ठेवत रोहीतने आपल्या कारकिर्दीतील दुसरे द्विशतक गाठले. याआधी मुंबईकर रोहीतने आपल्या बंगळुरूमध्ये २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांची खेळी साकारली होती. परंतु, यावेळी रोहीतने २६४ धावा ठोकून एकदिवसीय क्रिकेटमधील नव्या विक्रमाची ऐतिहासिक मोहोर उमटवली आहे.

Story img Loader