तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकले.. असेच काही युवराज सिंगच्या बाबतीत म्हणता येईल. बऱ्याच महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या युवराजने स्फोटक फलंदाजीने चौफेर फटकेबाजीचा नजराणा पेश करत तमाम चाहत्यांची मने जिंकली. युवराजच्या नाबाद ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे २०२ धावांचे आव्हान पार करत एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यावर कब्जा केला.
ऑस्ट्रेलियाचे आव्हानात्मक उद्दिष्ट गाठताना भारताने दुसऱ्याच षटकांत रोहित शर्माचा (८) बळी गमावला. त्यानंतर शिखर धवन (३२) आणि सुरेश रैना (१९) यांनी भारताचा डाव सावरला. हे दोघेही तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने (२९) युवराजला साथ देत भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. भारताची ४ बाद १०० अशी स्थिती असताना युवराजने चौफेर फटकेबाजी केली. २४ चेंडूंत ४९ धावांची आवश्यकता असताना जेम्स फॉल्कनरच्या षटकांत तब्बल २० धावा करत युवराजने भारताला विजयासमीप आणून ठेवले. त्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने पाचव्या विकेटसाठी १०२ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ३५ चेंडूत आठ चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करणारा युवराज सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.  
आरोन फिन्चच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ बाद २०१ धावांचा डोंगर उभा केला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पाटा खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलदाजांनी वर्चस्व गाजवले. फिन्चने आरोन मॅडिसनसह ५३ धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात करून दिली. फिन्चने १५ चौकार आणि एक षटकार लगावत ८९ धावा फटकावून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. विनय कुमार आणि भुवनेश्वर कुमार यांनी मधल्या फळीतील फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना थोपवून धरले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ७ बाद २०१ (आरोन फिन्च ८९, निक मॅडिसन ३४; आर. विनय कुमार ३/२६, भुवनेश्वर कुमार ३/३५) पराभूत वि. भारत : १९.४ षटकांत ४ बाद २०२ (युवराज सिंग नाबाद ७७, शिखर धवन ३२; क्लिंट मकाय २/५०). सामनावीर : युवराज सिंग.

Story img Loader