ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवलेल्या इंग्लंडने रविवारी दुसरा सामना जिंकत मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद १५७ धावा केल्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने सलामीला येत नाबाद ७७ धावा ठोकल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

इंग्लंडला दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची सुरूवात काहीशी अनपेक्षितच झाली. जॉनी बेअरस्टो ९ धावांवर हिट विकेट झाला. त्याने फटका खेळताना स्वत:ची बॅट स्टंपवर मारली. चेंडू बाउन्सर असल्याने त्याने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू सोडून चुकून त्याची स्टंपला लागली आणि तो माघारी परतला. टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध स्वयंचीत (Hit Wicket) झालेला तो पाचवा फलंदाज ठरला. या आधी एबी डीव्हिलियर्स, गॅरेथ हॉपकिन्स, दिनेश चांडीमल, मार्क चॅपमन हे चौघे हिट विकेट झाले होते.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, सामन्यात बेअरस्टो बाद झाल्यावर डेव्हिड मलानने बटलरला साथ दिली. या दोघांनी १३व्या षटकात इंग्लंडला शंभरी पार करून दिली, पण ४२ धावांवर मलान बाद झाला. टॉम बॅन्टन आणि इयॉन मॉर्गन स्वस्तात बाद झाले. पण बटलरने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि दमदार खेळ केला. ५४ चेंडूत त्याने नाबाद ७७ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना वॉर्नर शून्यावर बाद झाला. अलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथदेखील एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. नंतर मार्कस स्टॉयनीस आणि फिंचने डाव सांभाळला. फिंचने सर्वाधिक ४० धावा केल्या तर स्टॉयनीस ३५ धावा करून बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५ बाद ८९ होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि अश्टन अगार या दोघांनी ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या गाठून देण्यास मदत केली. पण अखेर विजयासाठी ती धावसंख्या अपुरी पडली.