सचिनचे आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय. चोवीस वर्षे भारताला संमोहित करणाऱ्या सचिनचा अदभूत बालक ते क्रिकेटचा देव हा प्रवास त्याच्या स्वत:च्या निवेदनातून समजून घेण्यास तमाम क्रिकेट वारकरी आतूर आहेत, सज्ज आहेत. मोठय़ा असामीचे आत्मचरित्र प्रसिद्ध होणार म्हटल्यावर प्रचंड यूफॉरिआ तयार होतो. तो धगधगता ठेवण्याकरीता प्रकाशक त्या पुस्तकातला काही मसालेदार भाग टप्प्याटप्प्याने मीडियाला पुरवतात. गेल्या काही दिवसांत असाच काही चटकदार भाग वर्तमानपत्रांतून येतोय. त्यातला सर्वात मोठा तडका सचिनच्या चॅपलबॉम्बचा आहे.
सचिनने लिहिले आहे, की चॅपेलने सचिनला द्रविडऐवजी कर्णधार होण्याची ऑफर दिली होती. आपण दोघे मिळून भारतीय क्रिकेटवर राज्य करू, असे ग्रेग चॅपल म्हणाले होते. हे प्रकरण मीडियात आल्यावर लोक गेले दोन दिवस चर्चाचर्वणात रंगून गेले. मीडियाने गुऱ्हाळ सुरू केले. माजी खेळाडूंच्या मुलाखती झाल्या. गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन सर्वानी तोफगोळे टाकले. सर्वानी चॅपेल यांची यथेच्छ धुलाई केली.
या सगळय़ा गडबडीत द्रविडने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘पुस्तक वाचून मी बोलायचं का नाही हे ठरवेन,’ असे तो म्हणाला. धोरण, विवेक आणि सावधानता याचा मेरुमणी असल्याने द्रविडची ही प्रतिक्रिया अपेक्षित होती. हा माणूस श्वासदेखील विचारपूर्वक घेतो, असे म्हटले जाते. आता प्रश्न आहे, की द्रविड भविष्यात प्रतिक्रिया देईल का? मला वाटते, प्रतिक्रिया दिली तरी अतिशय त्रोटक, चतुर अशी असेल. अघळपघळ, कुणाला दोष देणारी, सचिनला खुला पाठिंबा देणारी नक्कीच नसेल.
आपण एक लक्षात घ्यायला हवे की सचिन आणि द्रविड हे मोठे खेळाडू. द्रविड सचिनच्या नंतर सात वर्षांनी संघात आला. तोपर्यंत सचिनची दहा कसोटी शतके आणि आठ एकदिवसीय शतके झाली होती. त्याच्या शैली आणि सातत्याच्या जोरावर तो भारतातच नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. पुढील चार-पाच वर्षांत द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आणि सर्वात भरवशाचा खेळाडू, क्रायसीस मॅन म्हणून लौकिक मिळवला. मोक्याच्या क्षणी उभा राहणार तो द्रविडच, असे चित्र निर्माण झाले. जे वास्तव होते. सचिन मोक्याच्या क्षणी निराश करतो, असे चित्र तयार होऊ लागले. त्यातून द्रविड सचिनमध्ये एक स्पर्धा निर्माण झाली. सचिनची अनेक शतके रेकॉर्डकरीता असतात, संघाकरीता नाही, असा समज निर्माण झाला. पाकिस्तानात सचिन द्विशतकाच्या उंबरठय़ावर असताना द्रविडने डाव घोषित केला, हे त्याचेच उदाहरण. सचिनने सारा देश टीव्हीसमोर बसवला हे त्रिकालाबाधित सत्य होते. त्यामुळे सचिनला काही गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात, असे वाटत होते. त्याला ओपनिंगला यायचे होते. द्रविड, चॅपेलला वाटत होते त्याने मिडल ऑर्डरला खेळावे. त्यातून द्रविडने कधी ओपनिंग, कधी यष्टिरक्षण, कधी तीन नंबरला, कधी खालच्या क्रमांकावर येऊन संघहित सर्वात मोठे हे दाखवून दिले.
सचिनच्या शैलीचे जनमानसावर विलक्षण गारुड होते. त्याच्या शैलीने लोक पागल झाले होते. त्याच्या प्रकाशझोतात मंदपणे तेवणाऱ्या द्रविडचे फारसे कौतुक झाले नाही. द्रविडच्या वडिलांच्या तोंडूनदेखील हे शल्य ऐकायला मिळाले होते. सचिनच्या महानतेविषयी द्रविडलासुद्धा शंका नाही. पण ज्याच्या सावलीत करीअर गेले त्या सचिनबद्दल प्रत्येक गोष्टीत तो भरभरून बोलेल अशी अपेक्षा ठेवू नये. शेवटी तोसुद्धा आधी माणूस आहे आणि मग खेळाडू. पण तो एक सदगृहस्थ आहे, याविषयी दुमत असू नये.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Story img Loader