Paris Olympics 2024 Indian Hockey Team In Semifinal: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. ४ ऑगस्ट रोजी ग्रेट ब्रिटनशी झालेल्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा ४-२ असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाचा सामना वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीशी होणार आहे. दरम्यान रविवारी (४ ऑगस्ट) जेव्हा भारताचा विजय झाला, तेव्हा या सामन्याचे समालोचन करणाऱ्या सुनील तनेजा यांना कॉमेंट्री करत असतानाच रडू कोसळलं. भारत जिंकलाय, आपण उपांत्य फेरीत पोहोचलय, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडू लागले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा खेळाडू अमित रोहिदास याला रेड कार्ड दिल्यानंतर अवघ्या १० खेळाडूंसह सामना खेळत भारतीय संघाने विजय मिळविला. त्यामुळे हा विजय सर्वांसाठीच खास बनला. ऑलिम्पिक हॉकी संघाचे अधिकृत प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीवर सुनील तनेजा हे हिंदीतून कॉमेंट्री करत होते. यावेळी पेनल्टी शूटआऊटमध्ये जसा जसा एक-एक गोल भारताकडून होत होता, तसा लाखो चाहत्यांप्रमाणेच तनेजा यांचाही उत्साह शिगेला पोहोचत होता. जेव्हा राजकुमार यांनी निर्णायक शेवटचा गोल केला, तेव्हा आनंदाच्या भरात भारत जिंकल्याचे सांगताना सुनील तनेजा यांना अशरक्षः रडू कोसळले.
“भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे”, असे ओरडून ओरडून सांगितल्यानंतर सुनील तनेजा ढसाढसा रडू लागले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सावरून घेतलं. द खेल इंडिया या एक्स अकाऊंट युजरने हा व्हिडीओ चित्रीत करून पोस्ट केला. जो आता सुनील तनेजा यांनीही शेअर केला आहे.
ग्रेट ब्रिटनच्या सामन्यात काय झालं?
भारतीय पुरुष हॉकी संघाने गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या भक्कम कामगिरीच्या जोरावर ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने रविवारी ग्रेट ब्रिटनचे आव्हान नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ४-२ असे परतवून लावले.
ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूविरुद्ध स्टिक उगारल्याने भारताच्या अमित रोहिदासला लाल कार्ड दाखवून थेट बाहेर काढण्यात आले. त्यानंतरही दहा खेळाडूंसह खेळताना ४० मिनिटे भारताने धैर्याने लढत देत ग्रेट ब्रिटनला १-१ असे बरोबरीत रोखले. शूटआऊटमध्ये दोन्ही संघांच्या पहिल्या दोन प्रयत्नांनंतरही २-२ अशी बरोबरी कायम होती. पण, नंतर पुन्हा एकदा श्रीजेश भारतासाठी धावून आला. त्याने कॉनर विल्यम्स आणि फिलिप रॉपरचे प्रयत्न फोल ठरवून भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून हरमनप्रीत, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय, राजकुमार पाल यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.