आपल्या देशात क्रीडा क्षेत्रासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. हे लक्षात घेता भारत हा क्रीडासत्ता बनवण्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे नवे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राठोड यांनी अ‍ॅथेन्स येथे २००४मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत रौप्यपदक मिळवले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खांदेपालटात विजय गोयल यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक खाते राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे.

राठोड पुढे म्हणाले, ‘‘ग्रामीण स्तरापासून ते ऑलिम्पिक स्तरावरील प्रत्येक स्पर्धामध्ये भारताचे खेळाडू पदकविजेते व्हावेत, यासाठी माझा भर राहणार आहे. क्रीडा खाते हा प्रत्येक राज्याचा विषय असतो. साहजिकच प्रत्येक राज्याच्या सहकार्यानेच मला काम करावे लागणार आहे. प्रत्येक खेळाडूपुढे सतत आव्हान असते व ते साध्य करण्यासाठी त्याला अनेक स्तरांवर संघर्ष करावा लागतो. त्याच्या यशाच्या मार्गातील हे अडथळे कमी करण्यासाठी मी काही सकारात्मक बदल करणार आहे.’’

‘‘युवक कल्याण खाते माझ्याकडे असल्यामुळे देशातील युवा पिढीमधील व्यक्तिमत्त्व विकासास कशी चालना मिळेल, या दृष्टीने काही योजना तयार केल्या जातील व त्यांची त्वरित अंमलबजावणी कशी होईल, हे मी पाहणार आहे,’’ असेही राठोड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committed to give players best facilities says rajyavardhan singh rathore