गोल्डकोस्ट येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या राहुल आवारेने कुस्तीत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात करत राहुलने या स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. शेवटच्या फेरीत स्टिव्हन ताकाहाशीने राहुलला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने स्टिव्हन ताकाहाशीचा डाव त्याच्यावरच उलटवत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं. राहुलने सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुण्यात त्याचे प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीत विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. आपण पाहिलेलं स्वप्न राहुलने पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षक काका पवार यांनीही यावेळी समाधान व्यक्त केलं.
याव्यतिरीक्त ५३ किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत बबिताला कॅनेडीयन प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली. तर ७६ किलो हेवीवेट वजनी गटात भारताच्या किरणनेही कांस्यपदकाची कमाई केली. पाठोपाठ भारताच्या सुशील कुमारने हेविवेट गटात सुवर्णपदकाची कमाई करत भारताला कुस्तीतून दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं.
याचसोबत अॅथलेटिक्समध्येही भारताने आज पदकांचं खातं उघडलं. थाळीफेक प्रकारात भारताच्या सीमा पुनिया आणि नवजीत कौर धिल्लोनने अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. त्याआधी महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल प्नोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. नेमबाजीत भारताला मिळालेलं हे १२ वं पदक ठरलं आहे. त्यामुळे दिवसभरात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे.
- हॉकीत भारतीय महिला कांस्यपदकासाठी इंग्लंडविरुद्ध खेळणार
- हॉकी – उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया महिला संघाची भारतावर १-० ने मात
- थाळीफेक प्रकारात भारताच्या सीमा पुनिया आणि नवजीत कौरला अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक
- अॅथलेटिक्समध्ये भारताच्या खात्यात २ पदकांची नोंद
- टेबल टेनिस – मनिका बत्रा उपांत्य फेरीत दाखल
- अवघ्या १ मिनीट २० सेकंदात दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पर्ध्यावर केली मात
- ७४ किलो वजनी हेविवेट गटात भारताच्या सुशील कुमारला सुवर्णपदक
- ७६ किलो वजनी गटात भारताच्या किरणला कांस्यपदक
- राहुलची अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात
- कुस्तीत भारताला पहिलं सुवर्णपदक, गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताचं कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक
- ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बबिताने पटकावलं होतं सुवर्णपदक
- आठव्या दिवशी भारताच्या खात्यात २६ व्या पदकाची भर
- ५३ किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटला रौप्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर
- अंतिम फेरीत तेजस्विनीच्या खात्यात ६१८.९ गुण, भारताची अंजुम मुद्गील मात्र पदकांच्या शर्यतीमधून बाहेर
- ५० मी. रायफल प्रोन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला रौप्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एक पदक
- ७४ किलो वजनी गटात भारताचा सुशील कुमार अंतिम फेरीत दाखल
- पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालवर मात करत महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत
- टेबल टेनिस – मिश्र दुहेरी प्रकारात भारताचे अंचता शरथ कमाल आणि मौमा दास उपांत्यपूर्व फेरीत
- बॅडमिंटन – सत्विकसाईराज रणकीरेड्डी आणि आश्विनी पोनाप्पा मिश्र दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत दाखल
- तिहेरी उडीत भारताचे राकेश बाबु आणि अर्पिंदर सिंह अंतिम फेरीत दाखल
- कुस्ती – ५३ किलो वजनी गटात भारताची बबिता कुमारी पुढच्या फेरीत दाखल
- १०० मी. शर्यतीत भारताची पुर्णिमा हेरंभ पहिल्या फेरीत दुसऱ्या स्थानावर
- श्रीलंकन प्रतिस्पर्ध्यावर केली मात
- टेबल टेनिस – भारताची मनिका बत्रा व मौमा दास महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत