रंगांची उधळण, संगीत आणि उत्साह यांचा सुरेख मिलाफ असलेल्या दिमाखदार सोहळ्याने राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता झाली. पॉप स्टार कायली मिनोग्यु या सोहळ्याचे आकर्षण ठरली. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या उपस्थितीत ‘अर्ल ऑफ वेसेक्स’ आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे प्रमुख प्रिन्स इडवर्ड यांनी ग्लासगो राष्ट्रकुल २०१४ स्पर्धा संपन्न झाल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच आसमंतात फटक्यांची आतषबाजी झाली आणि उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अकरा दिवसांच्या या क्रीडा मेळाव्यात अव्वल क्रीडापटूंनी आपले कौशल्य सादर करताना पदकांसह जगभरातल्या चाहत्यांची मने जिंकली. ७१ देशांतील एकूण ४९२९ क्रीडापटूंनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला. ग्लासगो संयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेचा झेंडा पुढील स्पर्धेच्या आयोजकांकडे सोपवला. पुढची राष्ट्रकुल स्पर्धा ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणार आहे.
हॅम्पडेन पार्क स्टेडियममध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात स्कॉटलंडच्या गायकांच्या तालावरच्या लेझरच्या कार्यक्रमाने बहार आली. अ‍ॅथलिट सीमा पुनियाने समारोप सोहळ्यात भारताच्या पथकाचे नेतृत्व केले. भारताने ६४ पदकांसह गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले. भारताच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे स्पर्धेला गालबोट लागले मात्र भारतीय क्रीडापटूंची कामगिरी प्रशंसनीय होती.
राष्ट्रकुल महासंघाचे प्रमुख प्रिन्स इम्रान यांनी सुरेख आयोजनासाठी स्कॉटलंडची प्रशंसा केली. स्पर्धा सुरळीत व्हावी यासाठी ग्लासगो शहर आणि सर्व स्कॉटलंडवासीयांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
वेल्शची ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकपटू फ्रान्सेका जोन्सला स्पर्धेतील सर्वोत्तम क्रीडापटूच्या डेव्हिड डिक्सन पुरस्काराने गौरवण्यात आले. फ्रान्सेकाने एका सुवर्णासह पाच रौप्यपदकांवर नाव कोरले.
‘ऑल बॅक टू अवर्स’ या संकल्पनेवर आधारित समारोप सोहळ्यात स्कॉटलंडची गायिका आणि अभिनेत्री ल्युलूने आपले गाणे सादर केले. विविध देशांच्या क्रीडापटूंचे स्टेडियममध्ये आगमन झाले. स्टॅण्ड अप विनोदवीर डेस क्लार्कने उपस्थितांचे मनोरंजन केले. पॉप गायिका मिनोग्युने आपली प्रसिद्ध गाणी सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा