भारताचा १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुगाने आज (३१ जुलै) राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने मिळवलेले पदक हे २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे पाचवे पदक ठरले. जेरेमीने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपल्या पहिल्या पदकावर नाव कोरले. खेळादरम्यान त्याच्या हातावरील टॅटूने अनेकांचे लक्ष वेधले.
त्याच्या डाव्या हातावर एक वजन उचणाऱ्या व्यक्तीचा टॅटू आहे. ज्यावर रोमन अंकांमध्ये ११ नोव्हेंबर २०११ तारीख लिहिली आहे. त्या व्यक्तीच्या बरोबर खाली बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेली आणखी एक व्यक्ती आहे. त्याच्या या रहस्यमयी टॅटूमुळे अनेकांचे कुतुहल वाढले होते. जेरेमीने आपल्या टॅटूचा अर्थ उलगडला आहे. वेटलिफ्टिंगकरणारी टॅटूतील व्यक्ती तो स्वत: आहे. ११ नोव्हेंबर २०११ रोजी त्याने वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात केली होती. बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेली व्यक्ती जेरेमीचे वडील आहेत.
जेरेमीचे वडील तरुणपणी मिझोराममधील आयझॉल बॉक्सिंग सर्किटमधील एक ओळखीचा चेहरा होते. त्यांने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती. परंतु, कुटुंबातील आर्थिक समस्यांमुळे त्यांना खेळ सोडून नोकरी करावी लागली. आपल्या टॅटू विषयी बोलताना जेरेमी म्हणाला, “मी वेटलिफ्टर आहे आणि माझे वडील बॉक्सर होते. आमच्या दोघांची गोष्ट या टॅटून प्रतिबिंबित होते.”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेरेमीने एक वेटलिफ्टर म्हणून नाही तर बॉक्सर म्हणून सुरुवात केली होती. नंतर, त्याने वेटलिफ्टिंग सुरू केली. सुरुवातीला ओल्या बांबूच्या मोळ्या उचलून त्याने प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. आठ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला पुणे येथील सैन्य क्रीडा संस्थेत प्रवेश मिळाला होता.