गुरुवारपासून (२९ जुलै) इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जवळपास २५० भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यातील अनेक खेळाडूंकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे. या खेळाडूंमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा वरचा क्रमांक होता. मात्र, स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर नीरज दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या उद्धघाटन सोहळ्यात तो ध्वजवाहक म्हणून भारतीय चमूचे नेतृत्व करणार होता. आता त्याची ही जबाबदारी बॅडमिंटनपटून पीव्ही सिंधू पार पाडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे स्पर्धेच्या उद्धघाटन सोहळ्यात ध्वजवाहक होण्याचा मान मिळणे अतिशय प्रतिष्ठेची बाब मानली जाते. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरजला ही संधी मिळाली होती. मात्र, त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
त्याच्या जागी भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूकडे ध्वजवाहकाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सिंधू भारताची ध्वजवाहक होती. तिने त्या स्पर्धेत महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले होते.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने रौप्यपदक (सिल्वर मेडल) जिंकले होते. अंतिम फेरीत भालाफेक करताना त्याने मांडीला दुखापत झाल्याची तक्रार केली होती. सोमवारी एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.