इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी सुरू आहे. खेळांच्या पाचव्या दिवशी आतापर्यंत भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई करता आली आहे. भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. त्यापूर्वी लॉन बॉल खेळामध्ये भारतीय महिला लॉन बॉल संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण पदक पटकावले.
भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरचा ३-१ असा पराभव केला. भारताकडून दुहेरी सामन्यात हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी विजयाची नोंद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. च्यु झे यू क्लेरेन्सने पुढील गेम जिंकून सिंगापूरला १-१ असे बरोबरीत आणले होते. पण, जी. साथियान आणि हरमीत देसाई यांनी आपापले वैयक्तीक सामने जिंकून भारताचे सुवर्णपदक निश्चित केले.
पुरुषांच्या टेबल टेनिसमधील सांघिक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने सुवर्ण पदक जिंकले होते.
हेही वाचा – CWG 2022: भारतीय मुलींची ऐतिहासिक कामगिरी; लॉन बॉलमध्ये केली सुवर्णपदकाची कमाई
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकूण ११ पदके मिळली आहेत. त्यापैकी वेटलिंफ्टिंगमध्ये आतापर्यंत भारताच्या नावावर एकूण सात पदकांची नोंद झाली आहे. तर, महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला लॉन बॉल संघानेही सुवर्ण पदक पटकावले आहे.