बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघांची घोडदौड सुरूच आहे. महिला संघा पाठोपाठ पुरुष संघानेदेखील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘पूल बी’च्या शेवटच्या सामन्यात वेल्सचा ४-१ असा पराभव केला. भारताच्यावतीने हरमनप्रीत सिंगने तीन नोंदवले. आजच्या विजयासह भारतीय संघ सलग चौथ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
ऑलिंपिकपदक विजेत्या भारताने शेवटच्या साखळी सामन्यात आक्रमक सुरुवात केली. हरमनप्रीतने दोन पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये रूपांतरीत करून दुसऱ्या क्वार्टरच्या हाफ टाईमला भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीत आणि गुरजंत सिंग यांनी शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल केल्याने भारत ४-० असा आघाडीवर होता. चौथ्या क्वार्टरमध्ये वेल्स संघासाठी जेरेथ फर्लाँगने एकमेव गोल केला.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात घानाचा ११-० आणि तिसऱ्या सामन्यात कॅनडाचा ८-० असा पराभव केला होता. तर, इंग्लंडसोबतच्या सामन्यात ४-४ अशी बरोबरी साधली होती. उपांत्य फेरीचे सामने शनिवार ६ ऑगस्ट रोजी खेळवले जातील. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीही सुवर्णपदक जिंकलेले नाही. यावेळी मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली सुवर्ण जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.
दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघदेखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यांनी त्यांच्या चौथ्या साखळी सामन्यात कॅनडाचा ३-२ असा पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघ पाचव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.