इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी सुरू आहे. खेळांच्या चौथ्या दिवशी भारताने लॉन बॉल खेळामध्ये ‘ना भूतो ना भविष्यती’ कामगिरी केली. भारतीय महिला लॉन बॉल संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे संघाचे रौप्य पदक निश्चित झाले आहे.
भारतीय महिलांच्या ‘फोर टीम’ने उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर १६-१३ अशी मात केली. या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. पण, नंतर त्यांनी चांगली आघाडी घेतली. नवव्या लेगनंतर दोन्ही संघ ७-७ असे बरोबरीत होते. १०व्या लेगनंतर भारताने १०-७ अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात लवली चौबे (नेतृत्व), पिंकी (द्वितीय), नयनमोनी सेकिया (तृतीय) आणि रूपा राणी टिर्की (स्किप) यांनी प्रभावी कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.
रौप्यपदक निश्चित केल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या नजरा आता अंतिम फेरीतील सुवर्णपदकाकडे लागल्या आहेत. मात्र, तिम फेरीत भारतासमोर तगड्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. दोन्ही देशांच्या संघांदरम्यान मंगळवारी सुवर्णपदकाची लढत होणार आहे.
राष्ट्रकुल २०२२ च्या पदकतालिकेत भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत. ही सर्वच्या सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत.