बर्मिगहॅम : राष्ट्रकुल बॅडिमटन स्पर्धेत भारताला सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत भारताला मलेशियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. अनुभवी खेळाडू किदम्बी श्रीकांतला आलेले अपयश भारतासाठी धक्कादायक ठरले, तर एकमेव विजय ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूलाच मिळविता आला.
या कामगिरीमुळे मलेशियाने चार वर्षांपूर्वी झालेल्या सुवर्ण लढतीतील पराभवाचा वचपा काढला. भारताच्या सात्त्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला दुहेरीतील पहिल्याच लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या तेंग फॉंग अरॉन शिया आणि वूई यिक सोह या जोडीच्या आक्रमकतेचा सामना करता आला नाही. त्यांनी दुहेरीची लढत १८-२१, १५-२१ अशी गमावली.
महिला एकेरीच्या लढतीत सिंधूलादेखील विजयासाठी झगडावे लागले. पहिल्या गेममध्ये सिंधूला विजयासाठी दुसऱ्या गेम पॉइंटची वाट पाहावी लागली. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने कमालीचा नियंत्रित खेळ करून विजय निसटणार नाही, याची काळजी घेतली. सिंधूने लढत २२-२०, २१-१७ अशी जिंकली.
जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असणाऱ्या श्रीकांतला या सामन्यात सूरच गवसला नाही. त्याने क्रमवारीत ४२व्या स्थानावर असणाऱ्या त्झे योंगविरुद्ध झालेल्या प्रदीर्घ रॅलीजमध्ये श्रीकांतचा अंदाज सातत्याने चुकला. त्झे योंगने लढत २१-१९, ६-२१, २१-१६ अशी जिंकली. त्यानंतर महिला दुहेरीत थिनाह मुरलीधरन आणि कुंग ले पर्ली टॅन जोडीने भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांच्यावर २१-१८, २१-१७ असा सहज विजय मिळवून मलेशियाच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय बॅडिमटन संघाच्या कामगिरीवर मी निश्चितच समाधानी नाही. आम्ही सुवर्णपदक जिंकण्यासाठी आलो होतो. मात्र, या वेळी अपयश आले. आता हे अपयश विसरून भारतीय खेळाडू वैयक्तिक स्पर्धेत आपली कामगिरी उंचावतील.
– मथियास बो, भारताचे दुहेरीचे प्रशिक्षक
स्क्वॉश : सौरवला एकेरीचे कांस्यपदक
बर्मिगहॅम : भारताच्या सौरव घोषालने बुधवारी स्क्वॉश एकेरीत कांस्यपदकाची कमाई केली. सौरवची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. स्क्वॉश क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे एकेरीतील पहिलेच पदक ठरले. अगदीच एकतर्फी झालेल्या सामन्यात त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवलेल्या यजमान इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रॉपचा ११-६, ११-१, ११-४ असा पराभव केला.
सौरव कमालीच्या आत्मविश्वासाने कोर्टवर उतरला होता. पहिल्या सेटच्या पहिल्या गुणापासून त्याने आक्रमक पवित्रा घेत सातत्याने विल्सट्रॉप याच्यावर दडपण ठेवले. सौरवने आपल्या आक्रमकतेला अचूकतेची जोड देत प्रत्येक सेटला मोठी आघाडी मिळवली. पहिल्या सेटला मिळवलेले आठ गुण वगळता विल्सट्रॉप सौरवसमोर आव्हान उभेच करू शकला नाही. दुसऱ्या सेटला तर त्याला अवघा एकच गुण मिळवता आला. तिसऱ्या सेटलाही त्याची मजल चार गुणांच्या पुढे जाऊ शकली नाही.
सामन्यातील प्रत्येक आघाडीवर सौरवने आपले वर्चस्व राखले होते. सेटमध्ये झालेल्या रॅलीजमध्ये त्याच्या खेळातील वेग लक्षवेधक होता. खेळातील सातत्य आणि फटक्यांवरील नियंत्रण हे त्याच्या खेळाचे वैशिष्टय़ होते. या कामगिरीने सौरव स्क्वॉश क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवली होती. मात्र ती सर्व दुहेरीतील होती. सौरवचे हे दुसरे राष्ट्रकुल पदक ठरले. चार वर्षांपूर्वी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत सौरवने दिपिका पल्लिकलच्या साथीत मिश्र दुहेरीत रौप्यपदक मिळवले होते.
चिनप्पा-संधू जोडीचा विजय
जोश्ना चिनप्पा आणि हिरदर पाल सिंग संधू यांनी स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. चिनप्पा आणि संधू जोडीने श्रीलंकेच्या येहेनी कुरुप्पू आणि रिवदू लकसिरी जोडीला ८-११, ११-४, ११-३ असे नमवले. त्याआधी, सुनन्या कुरूविलाने प्लेट गटामध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात गयानाच्या फुंग अ फाटला ११-७, १३-११, ११-२ अशा फरकाने पराभूत केले.सामन्याच्या सुरुवातीपासून सुनन्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
वेटलिफ्टिंग : लव्हप्रीतची कांस्यपदकाची कमाई
वेटलिफ्टिंग प्रकारातील आणखी एक पदक लव्हप्रीत सिंगने भारताला मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या १०९ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली.
भारताच्या २४ वर्षीय लव्हप्रीतने एकूण ३३५ किलो वजन उचलताना क्लीन अँड जर्क प्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्याने स्नॅच प्रकारात १९२ किलो व क्लिन अँड जर्कमध्ये १९२ किलो वजन उचलले.
लव्हप्रीतने स्नॅच प्रकारात आपली कामगिरी १५७ किलो वजनावरून १६३ किलोपर्यंत उंचावली. यानंतर तो संयुक्त दुसऱ्या स्थानावर होता. क्लीन अँड जर्क प्रकारात त्याने कमालीचे सातत्य राखले. राष्ट्रीय विक्रमालाही गवसणी घातली. पण त्याला अखेरीस कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. त्याला केवळ तीन किलोच्या फरकाने रौप्यपदकाला मुकावे लागले.
पंजाबमध्ये वडिलांच्या व्यवसायात उतरण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लव्हप्रीतला आई-वडिलांच्या आग्रहामुळेच खेळात कारकीर्द घडवण्याची प्रेरणा मिळाली. त्याने वयाच्या १३व्या वर्षी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केल्यावर कुमार गटात राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर कुमार गटाच्या आशियाई स्पर्धेत तो कांस्यपदकाचा मानकरी ठरला आणि आता त्याने वरिष्ठ गटातून राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. लव्हप्रीत २०१५पासून नौदलाच्या सेवेत आहे. कॅमेरूनचा ज्युनियर एनयाबेयेऊने ३६१ किलोसह सुवर्ण, तर सामोआचा जॅक ओपेलॉजने ३५८ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले. भारताने वेटलििफ्टगमध्ये आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदके मिळविली आहेत.
केवळ तीन किलोच्या फरकाने रौप्यपदकाला मुकावे लागल्यानंतर लव्हप्रीत निराश होता. वरिष्ठ गटाच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना पदक मिळविल्याचा आनंद निश्चित आहे. मात्र, पदकाचा रंग सोनेरी असता तर अधिक आनंद झाला असता.– लव्हप्रीत सिंग
भारताचा कॅनडावर विजय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघानेही आपली आगेकूच कायम राखली. इंग्लंडविरुद्ध ४-४ अशी बरोबरी पत्करावी लागल्यानंतर आज तिसऱ्या सामन्यात त्यांनी कॅनडाचा ८-० असा धुव्वा उडवला. भारतीयांनी दोन्ही सत्रात प्रत्येकी चार गोल केले. भारताकडून हरमनप्रीत सिंग (सातव्या मिनिटाला आणि ५६व्या मि.), अमित रोहिदास (१०व्या मि.), ललितकुमार उपाध्याय (२०व्या मि.), गुरजंत सिंग (२७व्या मि.), आकाशदीप सिंग (३८व्या मि. आणि ६०व्या मि.), मनदीप सिंग (५८व्या मि.) यांनी गोल केले. भारताने दिमाखदार विजय मिळवला असला तरी त्यांना पेनल्टी कॉर्नरद्वारे फारसे यश मिळाले नाही. भारतीय खेळाडूंना १० पैकी फक्त तीन कॉर्नरवर गोल नोंदवता आले.
महिला संघ उपांत्य फेरीत
भारतीय महिला हॉकी संघाने अ-गटाच्या सामन्यात कॅनडावर ३-२ असा विजय मिळवत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सलिमा टेटे (तिसऱ्या मिनिटाला) आणि नवनीत कौर (२२व्या मि.) यांनी भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर कॅनडाकडून ब्रिएने स्टेअर्स (२३व्या मि.) आणि हॅनाह हॉगने (३९व्या मि.) सामना २-२ असा बरोबरीत आणला. लालरेम्सियामीने (५१व्या मि.) पेनल्टीच्या साहाय्याने गोल झळकावत संघाला ३-२ अशा स्थितीत पोहोचवले. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजय साकारला.
ज्युडो : तुलिका मान अंतिम फेरीत
भारताच्या ज्युडोपटू तुलिका मानने महिलांच्या ७८ किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे भारताचे ज्युडोमधील आणखी एक पदक निश्चित झाले आहे. चार राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या तुलिकाने न्यूझीलंडच्या सिडनी अॅंड्रयूजला ‘इप्पॉन’ पद्धतीने पराभूत करत आगेकूच केली. तुलिकाचा सामना अंतिम सामन्यात स्कॉटलंडच्या साराह अॅडिलग्टनशी होणार आहे. अन्य भारतीय दीपक देसवालने पुरुषांच्या १०० किलो रेपेचाज फेरीत फिजीच्या टेविता ताकावायाकडून हार पत्करली.
बॉक्सिंग : नितू, हसमुद्दिन पुढच्या फेरीत
भारतीय बॉक्सिंगपटू हसमुद्दिन मोहम्मद (५७ किलो) आणि नितू गंघास (४८ किलो) यांनी अनुक्रमे पुरुषांच्या आणि महिलांच्या गटाची उपांत्य फेरी गाठली. हसमुद्दिनने नाम्बियाच्या ट्रायअगेन मॉर्निगवर ४-१ असा विजय नोंदवला. महिलांमध्ये नॉर्दन आर्यलडच्या निकोल क्लाइडने तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत केलेल्या गैरवर्तुकीमुळे नितूला पंचांनी विजयी घोषित केले.
लॉन बॉल्स : भारताच्या खेळाडूंची आगेकूच
लॉन बॉल्स क्रीडा प्रकाराच्या पुरुष एकेरीत मृदुल बोरगोहेनने आपले दोन्ही सामने जिंकले, तर महिला दुहेरीत लवली चौबे आणि नयनमोनी सैकिया जोडीने एक सामना जिंकला, तर एक बरोबरीत सोडवला. मृदुलने फॉकलंड आयलंड्सच्या खिस लॉकीला २१-५ असे हरवले, तर स्कॉटलंडच्या इयान मॅकलीनचा २१-१९ असे पराभूत केले. दुहेरीत लवली-नयनमोनी जोडीने न्योएच्या हिना रेरेइती आणि ऑलिव्हिया बकिंगहॅम यांच्यावर २३-६ अशा फरकाने विजय नोंदवला. याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिजेट कॅलिट्झ आणि कोलीन पिकेठ जोडीला नमवले.
अॅथलेटिक्स: थाळीफेक : सीमा पाचव्या, तर नवजीत आठव्या स्थानी
भारताची थाळीफेकपटू सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लोन यांना महिलांच्या अंतिम फेरीत अनुक्रमे पाचव्या आणि आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. पुनियाने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ५५.९२ अंतर थाळी फेकली, मात्र पदक मिळवण्यासाठी ही कामगिरी पुरेशी नव्हती. पुनियाला पहिल्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयश आले. ढिल्लोनने आपल्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ५५३.५१ मीटर अंतर थाळी फेकत सर्वोत्तम कामगिरी केली.गोल्ड कोस्ट येथे २०१८मध्ये झालेल्या स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते.
सीमा सलग पाचव्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळताना प्रथमच पदकापासून वंचित राहिली. सीमा २००६ पासून राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे. ‘‘माझी ही अखेरची राष्ट्रकुल स्पर्धा असली, तरी आपण अजून निवृत्ती पत्करलेली नाही. मला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे,’’ असे सीमाने सांगितले. सीमा केवळ ५५.९२ मीटर अंतरावर थाळीफेक करू शकली.