Commonwealth Games 2022 : येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी ७२ देशांतील जवळपास चार हजार ५०० खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढ्य समजला जातो. मात्र, भारताची तारांकित फलंदाज स्मृती मंधानाचे मत काहीसे वेगळे आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत असला तरी भारतीय संघही त्यांच्यापेक्षा कमी नसल्याचे, तिने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याबाबत मंधाना म्हणाली, “आम्ही अनेक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला आहे. टी २० क्रिकेटमध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. मी ऑस्ट्रेलियाला बलाढ्य संघ म्हणणार नाही.”

“ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोसविरुद्धचे सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही एका वेळी एका सामन्याचा विचार करू आणि तो जिंकण्याचा प्रयत्न करू. आमची तयारी पूर्ण झाली असून आम्हाला आशा आहे की, आम्ही भारताला पदक मिळवून देऊ. टोक्यो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. तो रोमहर्षक अनुभव होता. आमचीही नजर सुवर्णपदकावरच आहे. त्यासाठी आम्ही नीरजकडून प्रेरणा घेऊ,” असेही स्मृती मंधाना म्हणाली.

हेही वाचा – IND vs PAK T20 : पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये चाहत्यांना मिळणार पर्वणी

यावर्षी, प्रथमच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस ‘अ’ गटामध्ये आहे. तर, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका ‘ब’ गटामध्ये आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाकडे देण्यात आलेली आहे.

Story img Loader