बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या सुधीरने पॅरा हेविव्हेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पहिल्याच प्रयत्नात सुधीरने २०८ किलो वजन यशस्वीरित्या उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात रेकॉर्डब्रेक कामगिरी करत २१२ किलो वजन उचलून सुधीरने सुवर्णपदकाला गवसणी घातली. १३४.५ गुणांसह सुधीरने हा विक्रम रचला. या सुवर्णकामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : तुलिकाला रौप्य
या क्रीडाप्रकारात १३३.६ गुणांसह इकेचुक्वू ख्रिच्शियन ओबिचक्वूने रजत पदक तर मिकी युलेने १३०.६ गुण मिळवत कांस्य पदक जिंकले आहे. २७ वर्षीय सुधीर पोलिओग्रस्त आहे. या आजारपणाचा सामना करुन जिद्दीच्या जोरावर सुधीरने अथक प्रयत्नाअंती हे यश प्राप्त केले आहे.
सुधीरने यापूर्वी जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत २१४ किलो वजन उचलून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली होती. यावर्षी जूनमध्ये दक्षिण कोरियात ही स्पर्धा पार पडली. २०१३ सालापासून सोनिपतमध्ये कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या सुधीरने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चीनच्या हांगझोऊमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ साठी सुधीरने पात्रता फेरी पार केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा आता २०२३ मध्ये होणार आहे.