ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी हॉकी इंडियाने आज १८ सदस्यीस भारतीय संघाची घोषणा केली आहे. ४ एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश ब गटात करण्यात आला असून भारताच्या गटात पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंड यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ७ एप्रिलरोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

अझलन शहा हॉकी स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर हॉकी इंडियाने पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंवर आपला भरवसा दाखवलेला आहे. अझलन शहा हॉकी स्पर्धेत संघाचं नेतृत्व सांभाळणाऱ्या सरदार सिंहला या संघात जागा देण्यात आलेली नाहीये. सरदारला अझलन शहा स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्या कामगिरीचा फटका सरदारला बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधल्या फळीतला खेळाडू मनप्रीत सिंहकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं असून चिंगलीस सानाला उप-कर्णधार करण्यात आलेलं आहे. मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१७ चा आशिया चषक आणि वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं.

ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह आणि गोलकिपर पी. आर. श्रीजेशने या संघात पुनरागमन केलं आहे. श्रीजेशसोबत सुरक करकेराला सहायक गोलकिपरची संधी देण्यात आलेली आहे. आगामी २०२० टोकीयो ऑलिम्पीकच्या दृष्टीने भारतीय संघ सध्या तयारी करतो आहे. त्याआधी भारताला आशियाई खेळ, हॉकी विश्वचषक यासारख्या स्पर्धांचा सामोरं जायचं आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंच्या साथीने भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघ –

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा

बचावफळी – रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, गुरिंदर सिंह, अमित रोहिदास

मधली फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), चिंगलीन साना (उप-कर्णधार), सुमीत, विवेक सागर प्रसाद

आघाडीची फळी – आकाशदीप सिंह, सुनील वितलाचार्य, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंह

Story img Loader