Hardik Pandya and Suryakumar Yadav competition for India T20 captaincy : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे, ज्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध नवा कर्णधार आणि नवा संघ तयार होणार आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून टी-२० संघाच्या कर्णधाराबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव कर्णधार होऊ शकतो. कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचीही कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती असल्याचे समजते. त्यामुळे टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. याआधीही या दोन्ही खेळाडूंनी टी-२० इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे दोघांची आकडेवारी जाणून घेऊया.

कर्णधार म्हणून हार्दिकची आकडेवारी –

आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याकडे पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. विशेष म्हणजे हार्दिक या हंगामातला कधीही विसरणार नाही. कर्णधार म्हणून हार्दिकसाठी हा हंगाम खूपच खराब ठरला होता. यापूर्वी, हार्दिकला २०२२ मध्ये पहिल्यांदा गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते आणि पंड्याने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते.

हेही वाचा – IND vs SL : ‘विराट-रोहितच्या जागी ‘या’ खेळाडूंना सलामीला संधी द्या…’, माजी खेळाडूची मागणी

यानंतर, त्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने २०२३ साली सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. हार्दिकने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १६ सामने खेळले आहेत, ज्यापैकी १० जिंकले आहेत आणि ५ गमावले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला. या काळात हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयाची टक्केवारी ६५ टक्क्यांहून अधिक होती.

हेही वाचा – पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताकडून ११७ खेळाडू; १४० सहाय्यकांनाही मंजुरी; गोळाफेक प्रकारात आभा खातुआला डच्चू

कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची आकडेवारी –

सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. याशिवाय सूर्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ७ सामने खेळला आहे, ज्यापैकी टीम इंडियाने ५ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. या काळात सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयाची टक्केवारी ७१.४२ टक्के होती. हे आकडे पाहता, असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हार्दिक आणि सूर्या हे दोघेही टी-२० मध्ये चांगले कर्णधार आहेत, परंतु आता श्रीलंकेविरुद्ध या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडते पाहणे महत्त्वाचे आहे.