भारतीय संघाबरोबर गेले १५ महिने राखीव खेळाडू म्हणून कार्यरत असलेल्या अिजक्य रहाणे याला अखेर सलामीवीर म्हणून भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तंदुरुस्त नसलेला सलामीवीर शिखर धवन याच्याऐवजी स्थान मिळविण्यासाठी रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्यात चुरस आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे चौथ्या क्रिकेट कसोटीस २२ मार्च रोजी प्रारंभ होत आहे. भारताने पहिले तीन सामने जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटीत पदार्पणातच धवन याने शतक ठोकले होते. चौथ्या कसोटीसाठी धवन तंदुरुस्त झाला नाही तर रहाणे याला मुरली विजय याच्या साथीत सलामीत संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. रहाणे याला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पंधरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले असल्याचे समजते व पुजारा यानेच विजय याची सलामीत साथ द्यावी असे संघ व्यवस्थापनातील एका जबाबदार अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. कदाचित धवनऐवजी अभिनव मुकुंद यालाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर हे दोघेही दिल्लीचे सलामीवीर आहेत.
ऐनवेळी त्यांच्यापैकी एका खेळाडूसही पुन्हा संघात स्थान देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मालिकेत विजय निश्चित झाला असल्यामुळे शेवटच्या कसोटीकरिता संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने तिसरी कसोटी संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार हरभजनसिंग व अशोक दिंडा यांच्यापैकी एका गोलंदाजास चौथ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader